Surabhi Jayashree Jagdish
फुफ्फुसं श्वासातून ऑक्सिजन शरीरात पोहोचवतात आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकतात. शरीरातील प्रत्येक पेशीचं योग्य कार्य सुरळीत चालण्यासाठी पुरेसा ऑक्सिजन मिळणं आवश्यक असतं.
श्वास किती वेळ रोखून धरता येतो हे केवळ फुफ्फुसांच्या क्षमतेवर ठरत नाही. व्यक्तीचं वय, नियमित व्यायाम, हृदयाचं आरोग्य, शरीरातील ऑक्सिजनचा वापर आणि श्वसनाचा सराव या बाबी देखील महत्त्वाच्या असतात.
डॉक्टरांच्या मते श्वास रोखून धरण्याची चाचणी ही फुफ्फुसांचं आरोग्य तपासण्याची अधिकृत चाचणी नाही. फुफ्फुसांची खरी कार्यक्षमता तपासण्यासाठी स्पायरोमेट्रीसारख्या वैद्यकीय चाचण्या अधिक विश्वासार्ह मानल्या जातात.
सामान्यपणे निरोगी प्रौढ व्यक्तीला शांत अवस्थेत सुमारे 30 ते 60 सेकंद श्वास रोखून धरता येऊ शकतो. नियमित पोहणारे, योगाभ्यास करणारे किंवा खेळाडू अनेकदा 60 सेकंदांपेक्षा जास्त वेळही सहज श्वास रोखून धरू शकतात.
जर एखाद्या व्यक्तीला 20 सेकंदांपेक्षा कमी वेळ श्वास रोखून धरता येत असेल तर त्यामागे कमी फिटनेस, तणाव, चुकीची श्वसन पद्धत किंवा काही वैद्यकीय कारणं असू शकतात. याचा अर्थ फुफ्फुसांचा गंभीर आजार आहे, असं थेट समजणं योग्य नाही.
दररोज नियमित चालणं, धावणं, सायकल चालवणं किंवा श्वसनाचे व्यायाम केल्याने फुफ्फुसांची कार्यक्षमता सुधारण्यास मदत होते. धूम्रपान आणि तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहणं हे फुफ्फुसांचं संरक्षण करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं पाऊल आहे.
सतत श्वास लागणं, जिना चढताना त्रास होणं, दीर्घकाळ खोकला राहणं किंवा छातीत वारंवार जडपणा जाणवत असेल तर फुफ्फुसांची तपासणी करून घेणं गरजेचं आहे. डॉक्टर आवश्यकतेनुसार स्पायरोमेट्री, छातीचा एक्स-रे किंवा इतर चाचण्यांच्या मदतीने फुफ्फुसांची क्षमता तपासतात.