Surabhi Jayashree Jagdish
आजकाल हृदयाचे आजार अनेक लोकांमध्ये आढळतात. हृदयाचा त्रास झाला की छातीत दुखतंच, असं नाही. काही वेळा हृदयाच्या आजारांशी संबंधित लक्षणं पायांसह शरीराच्या इतर भागांतही दिसू शकतात.
हृदयाशी संबंधित काही आजारांमध्ये रक्तप्रवाह कमी झाल्याचा परिणाम पायांवर दिसू शकतो. रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यास पायांपर्यंत पुरेसं रक्त पोहोचत नाही. त्यामुळे पायांमध्ये वेगळी लक्षणं जाणवत असतील तर त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
थोडं चालल्यावर पोटऱ्या किंवा पाय दुखत असतील किंवा क्रॅम्प्स येत असतील तर त्यामागे रक्तप्रवाह कमी होण्याचं कारण असू शकतं. काही वेळ आराम केल्यानंतर हा त्रास कमी होत असेल, तर तो पेरिफेरल आर्टरी डिसीज (PAD) या रक्तवाहिन्यांच्या आजाराचं लक्षण असू शकतो.
पाय किंवा घोट्यांना वारंवार सूज येत असेल, बूट घट्ट वाटत असतील किंवा पाय जड झाल्यासारखे वाटत असतील, तर त्यामागे शरीरात द्रव साचण्याचं कारण असू शकतं. हृदयाची रक्त पंप करण्याची क्षमता कमी झाल्यास शरीरात द्रव साचून पायांना सूज येऊ शकते.
बाहेर उष्णता असतानाही पाय सतत थंड पडत असतील तर त्यामागे रक्ताभिसरणाची समस्या असू शकते. पायांकडे रक्त पोहोचवणाऱ्या रक्तवाहिन्या अरुंद झाल्यास पायांना पुरेसं रक्त मिळत नाही आणि ते थंड जाणवू शकतात.
पायाला झालेली छोटी जखम किंवा खरचटलेली जागा बराच काळ बरी होत नसेल तर त्यामागे रक्तप्रवाह कमी होण्याचं कारण असू शकतं. रक्तप्रवाह कमी झाल्यास जखमेपर्यंत पुरेसा ऑक्सिजन आणि आवश्यक पोषक घटक पोहोचण्यात अडचण येऊ शकते.
काही लोकांना रात्री पायांमध्ये जळजळ होणं, सुन्नपणा जाणवणं किंवा मुंग्या येण्याचा त्रास होतो. मधुमेह, नसांशी संबंधित समस्या किंवा रक्ताभिसरणातील अडचणी यांसारख्या वेगवेगळ्या कारणांमुळे ही लक्षणं दिसू शकतात.
ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.