Surabhi Jayashree Jagdish
आपण दररोज जे अन्न खातो त्यात मीठ हा महत्त्वाचा घटक असतो. पण काही लोक वजन कमी करण्यासाठी किंवा आरोग्य सुधारण्यासाठी अचानक मीठ खाणं बंद करतात. फक्त १५ दिवस मीठ पूर्णपणे सोडल्यास शरीरात काही सकारात्मक तर काही धोकादायक बदलही दिसू शकतात.
मीठ कमी झाल्यावर शरीरात पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे सुरुवातीच्या काही दिवसांत वजन थोडं कमी झाल्यासारखं वाटू शकतं. मात्र हे वजन चरबी कमी झाल्यामुळे नसून शरीरातील पाण्याचं प्रमाण घटल्यामुळे असतं.
जास्त मीठ खाल्ल्याने अनेक लोकांमध्ये उच्च रक्तदाबाची समस्या वाढते. १५ दिवस मीठ कमी केल्यास काही लोकांचा रक्तदाब नियंत्रणात येऊ शकतो. विशेषतः हाय ब्लड प्रेशर असलेल्या लोकांना याचा थोडा फायदा जाणवू शकतो.
सोडियम शरीरातील स्नायू आणि मज्जासंस्थेसाठी आवश्यक असतं. मीठ पूर्णपणे बंद केल्यास शरीरात सोडियमचं प्रमाण कमी होऊन थकवा, अशक्तपणा आणि चक्कर येण्यासारखी लक्षणं दिसू शकतात. काही लोकांना काम करताना ऊर्जा कमी झाल्यासारखीही भावना होऊ शकते.
मीठातील इलेक्ट्रोलाइट्स स्नायू व्यवस्थित काम करण्यासाठी आवश्यक असतात. मीठ अचानक बंद केल्यास पायात गोळे येणे किंवा स्नायूंमध्ये ताण जाणवू शकतो. विशेषतः जास्त घाम येणाऱ्या किंवा व्यायाम करणाऱ्या लोकांमध्ये हा त्रास अधिक दिसू शकतो.
सोडियमचं प्रमाण खूप कमी झाल्यास शरीरात लिक्विड संतुलन बिघडू शकतं. त्यामुळे काही लोकांना डोकेदुखी, चक्कर किंवा एकाग्रता कमी होण्याचा अनुभव येऊ शकतो. शरीराला अचानक झालेला हा बदल सहन करणं काही वेळा कठीण जाऊ शकतं.
मीठ हे अन्नाची चव वाढवणारं मुख्य घटक आहे. १५ दिवस मीठ न खाल्ल्यास सुरुवातीला अन्न बेचव वाटू शकतं. मात्र काही दिवसांनी नैसर्गिक चवीची सवय लागल्यामुळे फळं, भाज्या आणि इतर पदार्थांची मूळ चव अधिक जाणवू लागते.