Bharat Jadhav
झोपेत असताना डोळ्यांच्या कोपऱ्यात श्लेष्मल द्रव (म्युकस), तेलकट पदार्थ, त्वचेच्या पेशी आणि सूक्ष्म कण जमा होतात; त्यामुळेच सकाळी असा चिपाड दिसून येऊ शकते. जर याचे प्रमाण अचानक वाढले, रंग बदलला किंवा त्यासोबत लालसरपणा, वेदना आणि प्रकाशाचा त्रास जाणवला, तर त्याकडे 'सामान्य' म्हणून दुर्लक्ष करू नये.
'सेंटर फॉर साइट'च्या एका अहवालानुसार, डोळ्यांतून येणारा हा चिकट पदार्थ म्हणजे प्रामुख्याने म्युक्स, तेल, त्वचेच्या पेशी आणि अतिसूक्ष्म कण यांचे मिश्रण असते. यामुळे डोळ्यांचा पृष्ठभाग ओलसर व वंगणयुक्त राहण्यास मदत होते. त्यातून धुळीचे कण बाहेर टाकले जातात.
सकाळी थोड्या प्रमाणात स्राव दिसणे सामान्य आहे. जर याचे प्रमाण नेहमीपेक्षा जास्त असेल किंवा इतर लक्षणेही दिसू लागली, तर समस्या उद्भवू शकते.
जर तुम्हाला डोळ्यांच्या कोपऱ्यांत पातळ, पांढरट स्राव किंवा एक पातळ थर दिसून आला, तर त्याचे कारण कोरडेपणा, दीर्घकाळ स्क्रीनकडे पाहणे किंवा पंखे अथवा एअर कंडिशनर्सच्या हवेच्या प्रवाहामुळे होणारी जळजळ होत असते.
ही समस्या सहजपणे बरी होते. डोळ्यांना विश्रांती देणे आणि वंगण देणारे (लुब्रिकेटिंग) आय-ड्रॉप्स वापरणे फायदेशीर ठरते. जर ही समस्या कायम राहिली किंवा दृष्टी अंधुक झाली, तर तुम्ही डोळ्यांची तपासणी करून घेतली पाहिजे.
जर डोळ्यांतून सतत पाणी येत असेल आणि त्यासोबत सौम्य, चिकट स्राव होत असेल, तर त्याचे कारण ॲलर्जी किंवा व्हायरल कंजंक्टिवायटिस असू शकते. ॲलर्जीमध्ये तीव्र खाज सुटते, तर विषाणूजन्य संसर्गामुळे डोळे लाल होऊ शकतात. डोळ्यात काहीतरी गेल्यासारखे वाटू शकते.
जर तुम्हाला सकाळी डोळे उघडताना त्रास होत असेल आणि पापण्यांवर दाट, पिवळसर स्त्राव जमा झाला असेल, तर हे 'बॅक्टेरियल कन्जंक्टिव्हायटिस'चे लक्षण असू शकते. यासोबतच डोळ्यांत वेदना किंवा लालसरपणाही असू शकतो. डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
डोळ्यांतून हिरव्या रंगाचा स्त्राव होणे हे बॅक्टेरियाच्या गंभीर संसर्गाचे लक्षण असू शकते. जर हा स्त्राव पुसून काढल्यानंतर काही वेळातच पुन्हा जमा होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. कॉन्टॅक्ट लेन्स वापरणाऱ्यांनी अशा लक्षणांबाबत विशेष काळजी घ्यावी. त्वरित लेन्स काढून टाका, चष्म्याचा वापर करा.