Surabhi Jayashree Jagdish
बोंबील हा अरियिडी नव्हे तर Synodontidae सागरी मासा आहे. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर, विशेषतः महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तर कोकण परिसरात तो मोठ्या प्रमाणावर आढळतो.
ब्रिटिश काळात गुजरातमधील कच्छचा आखात, सौराष्ट्र किनारा आणि मुंबईजवळील अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणावर बोंबील पकडला जात होता. हा मासा मुंबईतील बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी रेल्वेने आणला जात असे.
ब्रिटिशांनी उभारलेल्या रेल्वे जाळ्यामुळे समुद्रकिनाऱ्यावरून ताजा आणि वाळवलेला बोंबील मोठ्या प्रमाणावर देशभर पोहोचू लागला. मुंबईमार्गे धावणाऱ्या मालगाड्यांमधून या माशाची वाहतूक केली जात असे.
ब्रिटिश काळात रेल्वेच्या डब्यांमध्ये हा वास पसरल्याच्या अनेक आठवणी आणि उल्लेख प्रवाशांनी नोंदवल्या असल्याची माहिती आहे. मात्र, हा वासच Bombay Duck हे नाव पडण्याचं कारण ठरलाय असं म्हटलं जातं.
मुंबई बंदरातून बोंबीलची देशांतर्गत तसंच काही परदेशी बाजारपेठांमध्येही निर्यात केली जात होती. वाळवलेला बोंबील दीर्घकाळ टिकत असल्यामुळे व्यापाऱ्यांसाठी तो फायदेशीर माल ठरला. त्यामुळे ब्रिटिश काळात मुंबईच्या मत्स्यव्यवसायात बोंबीलला विशेष आर्थिक महत्त्व प्राप्त झालं.
ब्रिटिश काळात Bombay Dak हा शब्द मुंबईहून धावणाऱ्या टपाल रेल्वे किंवा मेल सेवेसाठी वापरला जात असे. Dak हा शब्द हिंदी-उर्दूमधील डाक (टपाल) या शब्दावरून इंग्रजीत आला होता. या रेल्वेने टपालाबरोबरच विविध मालाची त्यात बोंबीलचाही समावेश असलेल्या मालाची वाहतूक केली जात होती.
Bombay Dak हा शब्द ब्रिटिश सैनिक आणि प्रवाशांच्या उच्चारात आणि वापरात हळूहळू Bombay Duck असा अपभ्रंश झाला. कारण बोंबील हा मासा Bombay Dak रेल्वेमार्गे देशभर पोहोचत असल्यामुळे त्याची ओळख त्या नावाशी जोडली गेली. त्यामुळे या माशाला "Bombay Duck" हे नाव पडलं.