Surabhi Jayashree Jagdish
आहारात पपईचा समावेश करणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. यामध्ये अनेक व्हिटॅमिन, खनिजे तसंच पपेन हे घटक असतात. जे तुमच्या शरीरासाठी महत्त्वाचे मानले जातात. जर तुम्ही दररोज पपई खाल्ली तर तुमच्या शरीरात काय चांगले बदल होतात ते जाणून घेऊया.
पपईमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. शरीरात असलेल्या पांढऱ्या रक्तपेशींमध्ये सुधारणा होते. ज्यामुळे कोणत्याही आजाराशी लढण्यास शरीराला दहा हत्तीचं बळ मिळतं.
पपईमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि लायपोपीन असे अँटीऑक्सिडंट्स असतात. ज्यामुळे तुम्हाला असलेला ताणतणाव कमी होण्यास मदत होते. परिणामी हार्ट अटॅकचा आणि कॅन्सरचा धोका कमी होण्यास मदत होते.
पपईमध्ये सोल्यूबल (विरघळणारे) आणि इन्सोल्यूबल (न विरघळणारे) अशा दोन्ही प्रकारचे फायबर असतात. हे फायबर अन्नाचं पचन होण्यास मदत करतात. त्यामुळे पपईच्या सेवनाने पचनाच्या समस्या उद्भवत नाहीत.
पपईमध्ये पपेन नावाचं पाचक एंजाइम असतं, जे शरीरात प्रोटीनची मात्रा संतुलित ठेवण्याचं काम करतं. ज्यामुळे तुमचं पोट दीर्घकाळ भरलेलं राहतं आणि अनावश्यक खाणं खात नाही.
पपईमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर कोलेस्ट्रॉल नियंत्रित आणि कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे हृदयाच्या आरोग्यावरही त्याचा चांगला फायदा होतो. त्यामुळे पपईचा समावेश तुम्ही आहारात केला पाहिजे.
ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.