ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आम्रखंड वडी हा आंब्याच्या आम्रखंडापासून तयार होणारा गोड व चविष्ट पदार्थ आहे. हा पदार्थ उन्हाळ्यात विशेष करून केला जातो.पण आजकाल बाजारात तयार आम्रखंड उपलब्ध असते. त्यापासून तुम्ही वडी तयार करु शकता.
घट्ट आम्रखंड, किसलेले खोबरे ,दूध पावडर, साजूक तूप , वेलची पूड आणि सजावटीसाठी चिरलेले ड्रायफ्रूट्स इत्यादी साहित्य लागते.
आम्रखंड घेताना आधीच घट्ट घ्यावे. जर आम्रखंड पातळ असेल तर थोडा वेळ फ्रिजमध्ये घट्ट होण्यासाठी ठेवून द्या. घट्ट आम्रखंडामुळे वडी नीट सेट होण्यास मदत होते.
एका भांड्यात घट्ट आम्रखंड, दूध पावडर आणि किसलेले खोबरे घ्या. सर्व साहित्य चांगले एकजीव होईपर्यंत मिक्स करुन घ्या. मिक्स करुन झाल्यावर त्यात वेलची पूड टाका.
एक मोठी कढई घ्या. त्यात साजूक तूप घालून तयार केलेले मिश्रण टाका आणि मध्यम आचेवर शिजवत ठेवा. मिश्रण सतत ढवळत रहा म्हणजे कढईच्या तळाला लागणार नाही. हे मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा.
मिश्रण कढईच्या कडा सोडू लागले की गॅस बंद करा. एका ताटाला तूप लावून मिश्रण त्यात पसरवा.
वडीवर बारिक चिरलेले काजू, बदाम किंवा पिस्ते घाला. हलकेसे वडीवर दाबून ड्रायफ्रूट्स मिश्रणात बसवा. यामुळे वडी अधिक आकर्षक दिसते आणि चवही छान लागते.
वडीचे ताट फ्रिजमध्ये 1 ते 2 तास थंड होण्यासाठी ठेवून द्या .मिश्रण पूर्णपणे सेट झाल्यावर ते बाहेर काढा. नंतर सुरीने चौकोनी किंवा डायमंड आकारात तुटडे करुन घ्या.
आम्रखंड वडी लहान मुलंसुध्दा आवडीने खातात. आम्रखंड वडी टिफिनसाठी किंवा पार्टीसाठी उत्तम पर्याय आहे. हि वडी एअरटाइट डब्यात फ्रिजमध्ये 2 ते 3 दिवस चांगली राहते.