Surabhi Jayashree Jagdish
संध्याकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी झटपट, चविष्ट आणि पोटभरण्यासारखं खायचं असेल तर चीज पराठा हा उत्तम पर्याय आहे. मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा हा पदार्थ घरी सहज तयार करता येतो.
चीज पराठा बनवण्यासाठी गव्हाचं पीठ, किसलेलं चीज, मीठ, तूप किंवा तेल आणि पाणी लागते. चवीसाठी तुम्ही थोडी कोथिंबीर, मिरची किंवा चाट मसाला देखील घालू शकता. सर्व साहित्य आधीच तयार ठेवलं तर बनवताना सोपं जातं.
एका भांड्यात गव्हाचं पीठ घेऊन त्यात चिमूटभर मीठ घाला. हळूहळू पाणी घालत मऊ आणि एकसारखं पीठ मळून घ्या. हे पीठ 10-15 मिनिटं झाकून ठेवल्यास पराठा मऊ बनतो.
किसलेलं चीज एका बाउलमध्ये घ्या आणि त्यात चवीनुसार मीठ आणि मसाले घाला. तुम्ही त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर किंवा मिरची घालून चव वाढवू शकता. हे स्टफिंग व्यवस्थित मिक्स करून तयार ठेवा.
मळलेल्या पीठाचे छोटे गोळे करून घ्या आणि त्याची छोटी पोळी लाटा. त्या पोळीमध्ये तयार केलेलं चीजचं मिश्रण ठेवा आणि पुन्हा लाटा. नंतर हलक्या हाताने पुन्हा पराठा लाटून घ्या.
तवा गरम करून त्यावर लाटलेला पराठा ठेवा. दोन्ही बाजूंनी तूप किंवा तेल लावून पराठा छान सोनेरी होईपर्यंत भाजा. मध्यम आचेवर भाजल्यास पराठा आतूनही नीट शिजतो.
गरमागरम चीज पराठा प्लेटमध्ये काढा आणि त्यावर थोडं बटर लावा. त्यासोबत दही, लोणचं किंवा टोमॅटो सॉस दिल्यास चव अजून वाढते. संध्याकाळच्या नाश्त्यासाठी हा पराठा अगदी परफेक्ट ठरतो.