Surabhi Jayashree Jagdish
भेंडीचं पाणी तयार करण्यासाठी ताजी भेंडी स्वच्छ धुऊन तिचे तुकडे केले जातात. हे तुकडे साधारणपणे एका ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवले जातात. सकाळी भेंडीचे तुकडे काढून उरलेलं पाणी प्यायलं जातं.
भेंडीमध्ये विरघळणारे फायबर आणि म्युसिलेज नावाचा चिकट, जेलसारखा घटक असतो. भेंडी पाण्यात बराच वेळ राहिल्यावर या घटकांचा काही भाग पाण्यात उतरतो आणि पाण्याला किंचित चिकटसर पोत येतो. याच घटकांमुळे भेंडीच्या पाण्याचा पचनसंस्थेवर होणारा परिणाम समजून घेता येतो.
भेंडीतील विरघळणारे फायबर आतड्यांमधील पचनक्रियेसाठी फायदेशीर असतात. म्युसिलेजमुळे शौचास साफ होण्यास आणि आतड्यांची हालचाल सुरळीत होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे नियमित सेवन करणाऱ्या काही लोकांना बद्धकोष्ठता किंवा पोट फुगण्यासारख्या तक्रारींमध्ये फरक जाणवू शकतो.
भेंडीतील विरघळणारे फायबर पाण्याच्या संपर्कात आल्यावर जेलसारखे होते. त्यामुळे सकाळी भेंडीचं पाणी घेतल्यास काही काळ पोट भरल्याची भावना राहू शकते. परिणामी मधल्या वेळचं अनावश्यक खाणं कमी होण्यास मदत होऊ शकते.
भेंडीमध्ये असलेले आहारातील फायबर कार्बोहायड्रेटचं पचन आणि त्यातून ग्लुकोज शोषण्याची प्रक्रिया तुलनेने संथ करण्यास मदत करू शकते. त्यामुळे जेवणानंतर रक्तातील साखरेत होणारी झपाट्याने वाढ कमी होऊ शकते.
भेंडीमध्ये व्हिटॅमिन C, फोलेट, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमसह विविध पोषक घटक आढळतात. यामुळे तुमची त्वचा ग्लो होण्यास मदत होऊ शकते.
फायबरयुक्त आहारामुळे पचन आणि जेवणानंतरच्या ग्लुकोज प्रतिसादाला आधार मिळू शकतो, त्यामुळे दिवसभरातील ऊर्जेतील चढ-उतार कमी जाणवण्यास मदत होऊ शकते. भेंडीमध्ये आढळणारे फोलेट आणि मॅग्नेशियम शरीरातील विविध चयापचय प्रक्रियांमध्ये भूमिका बजावतात.
ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.