Surabhi Jayashree Jagdish
ChatGPT आज अनेकांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनलाय. एखादी माहिती हवी असेल, प्रश्नाचं उत्तर शोधायचं असेल किंवा एखादं काम सोपं करायचं असेल, तर अनेकजण थेट ChatGPT ची मदत घेतात. त्यामुळे अनेकदा मिळालेली माहिती योग्य आहे की नाही, याची खातरजमा न करता त्यावर विश्वास ठेवला जातो.
ChatGPT चा वापर करताना अनेकजण सहजपणे स्वतःशी संबंधित माहिती टाइप करतात. मात्र प्रत्येक वैयक्तिक तपशील चॅटमध्ये देणं योग्य नाही. विशेषतः संवेदनशील माहिती शेअर करण्याबाबत अधिक सावध राहणं गरजेचं आहे.
आधार क्रमांक, बँकेशी संबंधित माहिती, OTP किंवा पासवर्ड यांसारखे तपशील चॅटमध्ये टाकणं टाळावं. अशा माहितीचा संबंध थेट तुमच्या सुरक्षिततेशी आणि आर्थिक व्यवहारांशी असतो. त्यामुळे एखादे उत्तर मिळवण्यासाठीही अशी गोपनीय माहिती शेअर करू नये.
फक्त आर्थिक किंवा ओळख पटवणारी माहितीच नव्हे तर वैयक्तिक आयुष्यातील अतिशय खासगी गोष्टी सांगतानाही काळजी घ्यावी. आपल्या खासगी माहितीवर आधारित पुढील प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात, त्यामुळे काय शेअर करायचं याचा विचार आधी करणं महत्त्वाचं आहे.
यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेकायदेशीर कामांसाठी ChatGPT ची मदत घेणं टाळावं. हॅकिंग, बनावट आयडी तयार करणं किंवा एखाद्याला नुकसान पोहोचवण्यासारख्या गोष्टींबाबत माहिती मागणे योग्य नाही.
आरोग्याशी संबंधित प्रश्नांसाठी ChatGPT कडून सामान्य माहिती मिळू शकते, पण त्याला डॉक्टरांचा पर्याय मानता कामा नये. एखादा आजार, औषध किंवा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती असेल, तर केवळ चॅटमधील उत्तरावर अवलंबून राहणं योग्य नाही.
परीक्षेतील प्रश्नांची थेट उत्तरं मिळवण्यासाठी किंवा शैक्षणिक कामात फसवणूक करण्यासाठी ChatGPT चा वापर करणं टाळावं. एखाद्या प्रोजेक्टसाठी चीटिंग टूल्स किंवा गैरप्रकाराच्या पद्धती मागणंही योग्य नाही.
ज्याप्रमाणे स्वतःची खासगी माहिती जपणं महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे दुसऱ्या व्यक्तीची गोपनीयताही जपली पाहिजे. एखाद्या व्यक्तीच्या खासगी आयुष्याशी संबंधित माहिती मिळवण्यासाठी ChatGPT चा वापर करणं टाळावं.