Surabhi Jayashree Jagdish
कोथिंबीर साठवण्यापूर्वी पिवळी, सडलेली किंवा खराब पाने वेगळी काढून टाका. निरोगी आणि ताजी पानेच फ्रीजमध्ये ठेवल्यास ती अधिक काळ टिकतात. कोथिंबीर पूर्णपणे कोरडी असल्याची खात्री करूनच पुढील प्रक्रिया करा.
एअरटाइट डब्याच्या तळाशी एक टिश्यू पेपर अंथरा आणि त्यावर कोथिंबीर ठेवा. वरून पुन्हा एक टिश्यू पेपर ठेवून डबा बंद करा. टिश्यू अतिरिक्त ओलावा शोषून घेत असल्याने पाने काळी पडत नाहीत आणि जास्त काळ ताजी राहतात.
काचेच्या बरणीत थोडं स्वच्छ पाणी भरून त्यात कोथिंबिरीच्या देठाचा भाग बुडेल अशा प्रकारे ठेवा. वरून हलक्या प्लास्टिक पिशवीने किंवा कव्हरने झाकून ही बरणी फ्रीजमध्ये ठेवा. या पद्धतीमुळे कोथिंबिरीला आवश्यक ओलावा मिळतो आणि पाने ताजी राहण्यास मदत होते.
कोरड्या वर्तमानपत्रात किंवा किचन टॉवेलमध्ये कोथिंबीर हलक्या हाताने गुंडाळा. त्यानंतर ती फ्रीजमध्ये ठेवल्यास अतिरिक्त ओलावा नियंत्रित राहतो. त्यामुळे पाने लवकर खराब होत नाहीत आणि त्यांचा ताजेपणा टिकून राहतो.
कोथिंबीर बारीक चिरून आइस ट्रेमध्ये भरा आणि त्यात थोडे पाणी घालून गोठवा. तयार झालेले कोथिंबिरीचे क्यूब्स हवाबंद पिशवीत किंवा डब्यात ठेवू शकता. हे क्यूब्स सूप, ग्रेव्ही किंवा इतर पदार्थांमध्ये थेट वापरता येतात.
ओल्या अवस्थेत कोथिंबीर फ्रीजमध्ये ठेवल्यास ती लवकर सडू शकते. धुतल्यानंतर ती पूर्णपणे कोरडी होऊ द्या किंवा कापडाने हलक्या हाताने पुसा. योग्य कोरडेपणा राखल्यास कोथिंबीर अधिक दिवस ताजी राहते.
कोथिंबीर साठवण्यासाठी नेहमी स्वच्छ आणि एअरटाइट डबा वापरा. डबा वारंवार उघडणं-बंद करणं टाळल्यास आतील तापमान आणि ओलावा स्थिर राहतो. या सर्व टिप्सचा योग्य वापर केल्यास कोथिंबीर साधारण १० दिवसांपर्यंत ताजी, हिरवीगार राहू शकते.