Surabhi Jayashree Jagdish
लहान मुलांना शांतपणे जेवायला लावणं हे अनेक पालकांसाठी मोठं आव्हान असतं. काही मुलं जेवताना हट्ट करतात तर काहींचं लक्ष सतत इतर गोष्टींकडे जाते. अशा वेळी रागावण्यापेक्षा योग्य सवयी लावणं अधिक महत्त्वाचं ठरतं.
लहान वयापासून मुलांना स्वतःच्या हाताने जेवण्याची सवय लावणं फायदेशीर ठरतं. यामुळे त्यांचा उत्साह वाढतो आणि जेवणात त्यांचा सहभागही वाढतो.
मुलांना जबरदस्तीने किंवा रागावून जेवायला लावल्यास त्यांच्यात जेवणाबद्दल नकारात्मक भावना निर्माण होऊ शकतात. प्रत्येक मुलाची भूक आणि जेवण्याचा वेग वेगळा असतो, हे लक्षात घेणं आवश्यक आहे.
मुलं मोठ्यांचं अनुकरण करून अनेक सवयी आत्मसात करतात. जेव्हा ते घरातील सदस्यांना एकत्र बसून आनंदाने जेवताना पाहतात त्यावेळी त्यांनाही जेवण्याची इच्छा होते. दिवसातून किमान एक वेळ संपूर्ण कुटुंबाने एकत्र जेवण्याचा प्रयत्न करावा.
जेवताना स्क्रीनसमोर बसल्यामुळे मुलांचं लक्ष अन्नावर केंद्रित राहत नाही. मोबाईल किंवा टीव्हीच्या सवयीमुळे मुलांना भूक आणि पोट भरल्याची जाणीवही कमी होऊ शकते. त्यामुळे जेवणाची वेळ ही फक्त जेवणासाठीच असल्याचे त्यांना सातत्याने समजावून सांगावं.
रंगीत भाज्या, फळं आणि वेगवेगळ्या आकारांत सजवलेले पदार्थ मुलांना अधिक आकर्षित करतात. ताटातील पदार्थ पाहून त्यांची उत्सुकता वाढते आणि ते आनंदाने खाण्याचा प्रयत्न करतात. जेवण चविष्ट असण्याबरोबरच दिसायलाही आकर्षक असणं महत्त्वाचं आहे.