Surabhi Jayashree Jagdish
सकाळी उठल्यानंतर चहाचा कप घेण्याची सवय अनेकांना असते. कामाच्या धावपळीत थोडा वेळ विश्रांती घ्यायची असेल तरी चहा हा अनेकांचा आवडता पर्याय असतो. त्यामुळे रोजच्या आहारातील चहाचा आरोग्यावर नेमका काय परिणाम होतो हे जाणून घेऊया.
चहा प्यायल्याने अॅसिडिटी होते किंवा जास्त साखर घेतल्यास रक्तातील साखर वाढू शकते. त्याचबरोबर चहामुळे बॅड कोलेस्ट्रॉल म्हणजेच LDL कोलेस्ट्रॉल वाढतं का, असाही प्रश्न उपस्थित होतो. कोलेस्ट्रॉल आधीच वाढलेलं असल्यास चहा पूर्णपणे बंद करावा का, याबाबतही अनेकांच्या मनात संभ्रम असतो.
कार्डिओलॉजी तज्ज्ञ डॉ. तरुण कुमार यांच्या मते, साधारण चहा प्यायल्याने थेट बॅड कोलेस्ट्रॉल वाढतं, असं म्हणता येत नाही. त्याचप्रमाणे चहा प्यायल्याने कोलेस्ट्रॉल कमी होतं, असंही मानता येत नाही. मात्र चहामध्ये फुल-फॅट दूध आणि भरपूर साखर नियमितपणे वापरली तर अतिरिक्त कॅलरी आणि फॅटचं सेवन वाढू शकतं.
दूध आणि साखरेचं प्रमाण जास्त असलेला चहा वारंवार घेतल्यास दिवसभरातील एकूण कॅलरी वाढू शकतात. दीर्घकाळ अतिरिक्त कॅलरी घेतल्याने वजन आणि शरीरातील चरबी वाढू शकते. ज्यामुळे कोलेस्ट्रॉलसह हार्ट अटॅकच्या जोखमीत भर पडू शकते.
डॉ. तरुण कुमार यांच्या मते, दूध आणि साखर घातलेल्या चहापेक्षा ब्लॅक टी किंवा ग्रीन टी तुलनेने चांगला पर्याय ठरू शकतो. या पर्यायांमध्ये दूध आणि साखर कमी किंवा नसल्यामुळे अतिरिक्त कॅलरी आणि फॅटचं सेवन कमी ठेवता येतं.
कोलेस्ट्रॉल वाढलं आहे म्हणून प्रत्येक व्यक्तीने चहा पूर्णपणे बंद करणं आवश्यक नाही. मात्र दिवसातून किती कप चहा घेतला जातो आणि प्रत्येक कपात दूध व साखर किती असते यावर नियंत्रण ठेवणं महत्त्वाचं आहे. कमी फॅटचं दूध, कमी साखर किंवा शक्य असल्यास साखर न घालता चहा घेणं हा तुलनेने चांगला पर्याय ठरू शकतो.
पोटाशी संबंधित त्रास, उच्च रक्तदाब किंवा रात्री झोप न लागण्याची समस्या असलेल्या व्यक्तींनी चहा घेण्याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य ठरतं. चहामधील कॅफीन काही व्यक्तींवर अधिक परिणाम करू शकतं आणि विशेषतः रात्री उशिरा घेतल्यास झोपेवर परिणाम होऊ शकतो.
ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.