Surabhi Jayashree Jagdish
भात खाल्ल्याने थेट डायबेटीस होतो असं नाही. कारण टाइप-2 डायबेटीसचा धोका आनुवंशिकता, वजन, शारीरिक हालचाल आणि एकूण आहारपद्धती अशा अनेक घटकांशी संबंधित असतो. मात्र पांढऱ्या भाताचं अधिक प्रमाण वारंवार खाल्ल्यास आहारातील कार्बोहायड्रेटचं प्रमाण वाढू शकते आणि जेवणानंतर रक्तातील ग्लुकोज वेगाने वाढू शकतो.
भातामध्ये कार्बोहायड्रेट असतात आणि पचनाच्या प्रक्रियेत कार्बोहायड्रेटचे ग्लुकोजमध्ये रूपांतर होते. त्यामुळे भात खाल्ल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी वाढणं ही शरीराची सामान्य प्रतिक्रिया आहे. मात्र ही वाढ किती वेगाने आणि किती प्रमाणात होते, हे भाताचा प्रकार, शिजवण्याची पद्धत, खाल्लेले प्रमाण आणि त्यासोबत असलेल्या इतर पदार्थांवर अवलंबून असतं.
ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे एखाद्या कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थामुळे रक्तातील ग्लुकोज किती वेगाने वाढू शकतो, हे मोजण्याची पद्धत आहे. साधारणपणे 55 किंवा त्यापेक्षा कमी GI कमी, 56 ते 69 मध्यम आणि 70 किंवा त्यापेक्षा जास्त GI उच्च मानला जातो.
भाताच्या सर्व प्रकारांचा रक्तातील साखरेवर होणारा परिणाम सारखा नसतो. पॉलिश केलेल्या पांढऱ्या भाताच्या तुलनेत ब्राउन राइस आणि काही पारबॉइल्ड किंवा सेला राइसचे GI तुलनेने कमी असू शकते.
फक्त मोठ्या प्रमाणात भात खाण्याऐवजी त्यासोबत डाळी, कडधान्यं आणि भरपूर भाज्या घेणं अधिक संतुलित आहार तयार करतं. डाळी आणि कडधान्यांमध्ये प्रोटीन आणि फायबर असतात तर भाज्यांमधून फायबर आणि विविध जीवनसत्त्वं व खनिजं मिळतात.
डायबेटीस आहे म्हणून प्रत्येक व्यक्तीने भात पूर्णपणे बंद करणे आवश्यक नाही. मात्र भाताचं प्रमाण, त्याचा प्रकार आणि त्या जेवणातील इतर कार्बोहायड्रेट पदार्थ यांचं योग्य नियोजन करणं गरजेचं आहे. रक्तातील साखर नियंत्रित ठेवताना पांढऱ्या भाताचं मोठे प्रमाण टाळून अधिक फायबरयुक्त पर्याय आणि संतुलित ताट निवडणं फायदेशीर आहे.
भात खायचा असल्यास सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रमाणावर नियंत्रण ठेवणं. शक्य असल्यास ब्राउन राइस किंवा योग्य प्रकारचा पारबॉइल्ड राइस निवडून त्यासोबत डाळ, कडधान्यं आणि भरपूर भाज्या घेता येतात.
ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.