Surabhi Jayashree Jagdish
दररोज काही मिनिटं घरच्या घरी रक्तदाब तपासणं आणि त्याची रीडिंग घेणं ही साधी सवय तुमचा जीव वाचवू शकते. यामुळे तुम्ही हार्ट अटॅक येणार की नाही याचा अंदाज लावू शकता.
रक्तदाब दीर्घकाळ नियंत्रणात न राहिल्यास रक्तवाहिन्यांवर ताण येऊन हृदय, मेंदू, किडनी आणि डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नियमित तपासणीमुळे रक्तदाब वाढत असल्याचं लवकर लक्षात येण्यास मदत होते.
स्कॉटलंडमध्ये २०१९ ते २०२२ या कालावधीत उच्च रक्तदाब असलेल्या जवळपास ४.५ लाख लोकांच्या आरोग्यविषयक डेटाचा अभ्यास करण्यात आला. यापैकी सुमारे ९,५०० जणांनी घरच्या घरी रक्तदाब तपासला. यावेळी त्यांना हार्ट अटॅक, स्ट्रोक किंवा हार्ट फेल्युअरमुळे रुग्णालयात दाखल होण्याचा किंवा मृत्यूचा धोका नेहमीची उपचारपद्धती घेणाऱ्यांच्या तुलनेत ३४ टक्क्यांनी कमी असल्याचं दिसून आलं.
फक्त अधूनमधून क्लिनिकमध्ये रक्तदाब तपासण्याऐवजी घरच्या घरी केलेल्या नियमित मोजमापामुळे दैनंदिन जीवनातील रक्तदाबाची अधिक माहिती मिळू शकते. सलग रीडिंगमधून रक्तदाब वाढण्याची किंवा नियंत्रणात येण्याची प्रवृत्ती डॉक्टरांना समजण्यास मदत होते.
या अभ्यासातील रिमोट मॉनिटरिंग सेवेमध्ये रुग्णांना रक्तदाब तपासण्याची आठवण करून देण्यासाठी टेक्स्ट मेसेज पाठवले जात होते. रुग्णांनी नोंदवलेली रीडिंग आरोग्यसेवा देणाऱ्यांपर्यंत पोहोचत असल्याने चिंताजनक बदल लवकर ओळखणं शक्य झालं.
संशोधनात घरच्या घरी रक्तदाबाचं मॉनिटरिंग करणाऱ्या सहभागींच्या रक्तदाबात पहिल्या तीन महिन्यांत लक्षणीय सुधारणा दिसून आली. ही सुधारणा एक वर्षापेक्षा जास्त काळ टिकून राहिल्याचं संशोधकांनी नमूद केलंय.
रक्तदाब मोजण्यापूर्वी किमान पाच मिनिटं शांत बसावं आणि पाय जमिनीवर सपाट ठेवून पाठ व हाताला योग्य आधार द्यावा. मोजमापाच्या किमान ३० मिनिटं आधी कॅफीन, धूम्रपान आणि व्यायाम टाळणं अचूक रीडिंगसाठी उपयुक्त ठरते.
ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.