Surabhi Jayashree Jagdish
ज्वारीमध्ये आहारातील तंतू, प्रोटीन आणि काही महत्त्वाची खनिजे असतात. त्यामुळे ज्वारीची भाकरी पोट भरून ठेवण्यास मदत करते. ग्लुटेन टाळणाऱ्या व्यक्तींसाठीही शुद्ध ज्वारीची भाकरी हा नैसर्गिक पर्याय ठरू शकतो.
ज्वारीचं पीठ शक्यतो ताजं आणि बारीक दळलेलं असेल तर भाकरी चांगली लाटता येते. पीठात गरम किंवा उकळतं पाणी घालून ते व्यवस्थित एकत्र करणं महत्त्वाचं आहे. पीठ हाताला मऊ लागले पाहिजे, पण ते खूप पातळ किंवा चिकट होणार नाही याची काळजी घ्यावी.
पीठात पाण्याचं प्रमाण कमी असेल किंवा ते पुरेसे मळलं गेले नसेल तर लाटताना कडा तडकण्याची शक्यता वाढते. पीठ खूप कोरडं असल्यास त्यात लवचिकपणा राहत नाही आणि भाकरी पसरवताना तडे जातात.
ज्वारीच्या पिठात गरम पाणी घालून आधी चमच्याने किंवा पळीने ते एकत्र करावं. हाताला सहन होईल इतकं कोमट झाल्यावर पीठ चांगलं मळून घ्यावं. यामुळे पीठ एकसंध आणि मऊ होतं त्यामुळे भाकरी थापताना कडा फुटण्याचं प्रमाण कमी होतं.
पीठ मळून झाल्यावर काही मिनिटं झाकून ठेवलं तर त्यातील ओलावा व्यवस्थित पसरतो. त्यानंतर पुन्हा एकदा पीठ हलके मळून घेतल्यास ते अधिक मऊ होते. भाकरी थापताना कडा कोरड्या पडू नयेत म्हणून पिठाचा गोळा तयार केल्यानंतर तो उघडा ठेवू नये.
भाकरी थापण्यासाठी पाटावर किंवा परातीत थोडं ज्वारीचं पीठ पसरावं आणि गोळा हलक्या हाताने थापत जावा. कडा तडकत असतील तर बोटांना थोडं पाणी लावून त्या कडा अलगद जोडता येतात. भाकरी शक्य तितकी समान जाडीची थापल्यास ती तव्यावर व्यवस्थित शेकली जाते.
भाकरी तव्यावर टाकण्यापूर्वी तवा मध्यम ते मध्यम-उच्च आचेवर व्यवस्थित तापलेला असावा. भाकरी तव्यावर टाकल्यानंतर वरच्या बाजूला थोडं पाणी लावून ती योग्य वेळी उलटावी. तवा आणि आचेचे तापमान योग्य राहिल्यास भाकरी आतून नीट शिजते आणि योग्य पद्धतीने टम्म फुगण्याची शक्यता वाढते.