Surabhi Jayashree Jagdish
गाडीची RC, इन्शुरन्स आणि सर्व्हिस हिस्ट्री योग्य आहेत की नाही हे आधी तपासा. कागदपत्रांवरील गाडीचा नंबर आणि इतर माहिती गाडीशी जुळते का हे पाहा. सर्व्हिस हिस्ट्री पाहिल्यामुळे गाडीची वेळोवेळी सर्व्हिस झाली आहे का, याची माहिती मिळू शकते.
बोनट उघडून इंजिनच्या आसपास ऑईल लीकेज आहे का, हे नीट पाहा. इंजिन सुरू केल्यानंतर त्यातून नेहमीपेक्षा वेगळा किंवा मोठा आवाज येत नाही ना, हे ऐका. इंजिनच्या भागात तेलाचे डाग किंवा गळती दिसल्यास त्याची कारणे नक्की तपासा.
गाडीच्या मीटरवरील किलोमीटरची संख्या नीट तपासा. कमी किलोमीटर दाखवण्यासाठी मीटरमध्ये बदल किंवा रोलबॅक केला आहे का याची खात्री करा. मीटरवरील माहिती सर्व्हिस हिस्ट्री आणि गाडीच्या वापराशी जुळतं का हेही पाहणे महत्त्वाचे आहे.
गाडीच्या चारही टायरची झीज सारखी आहे का हे पाहा. टायरवर जास्त झीज असल्यास त्याकडे लक्ष द्या. गाडी खड्ड्यातून चालवताना कोणताही असामान्य आवाज येतो का, हेही तपासा.
गाडी खरेदी करण्यापूर्वी ती किमान ५ ते १० किलोमीटर चालवून पाहा. या वेळी गिअर सहज बदलतात का आणि गाडी चालवताना काही अडचण येते का हे तपासा. ब्रेक लावताना गाडी व्यवस्थित थांबते का आणि ब्रेकमधून वेगळा आवाज येत नाही ना हेही पाहा.
गाडी सुरू असताना सायलेंसरमधून निघणाऱ्या धुराचा रंग पाहा. काळा किंवा निळा धूर दिसत असल्यास इंजिनमध्ये काही समस्या असण्याची शक्यता तपासून घ्या. धुरासोबत वेगळा वास किंवा असामान्य आवाज जाणवत असल्यास त्याकडेही दुर्लक्ष करू नका.
गाडीतील AC, म्युझिक सिस्टम, पॉवर विंडो आणि सर्व लाइट्स एकेक करून चालवून पाहा. प्रत्येक सुविधा व्यवस्थित काम करते का हे तपासण्यासाठी त्यांचा काही वेळ वापर करा. यासोबतच गाडीची संपूर्ण तपासणी करा.