Shreya Maskar
दिवाळी जवळ आली की घराच्या साफसफाईला सुरुवात होते. जुन्या पणत्या, पितळी दिवे आणि समई स्वच्छ करण्याची ट्रिक जाणून घ्या, ज्यामुळे दिव्यांवर तेलाचे चिकट डाग, काजळी आणि काळपट थर निघून जाईल.
चिंच कोमट पाण्यात भिजवून तिचा घट्ट गर तयार करा. त्यात चिमूटभर मीठ मिसळा. मऊ कापडाने किंवा स्पंजने समईवर हलक्या हाताने लावा. स्वच्छ पाण्याने धुऊन लगेच कोरडी पुसा. काळपटपणा निघून जाईल.
पणत्यांमधील उरलेले तेल आणि वात काढून टाका. कोरड्या मऊ ब्रशने धूळ व काजळी अलगद काढा. तेलकट डाग असल्यास थोड्या ओलसर कापडाने स्वच्छ करा.
मातीच्या पणत्या पाण्यात जास्त वेळ भिजवू नका. रंगीत किंवा नाजूक पणत्या घासल्यास रंग निघू शकतो. मातीच्या पणत्या उन्हात चांगल्या वाळू द्या.
दिवा आणि पणत्यांमधील तेलाचे चिकट डाग काढण्यासाठी कोमट पाण्यात थोडे डिशवॉश लिक्विड मिसळा. पितळी. स्टीलच्या साध्या दिव्यांवरील तेलकट भाग मऊ स्पंजने स्वच्छ करा.
समईवरील नक्षीकाम, बारीक रेषा आणि कोपऱ्यांमध्ये साचलेली धूळ काढण्यासाठी कोरडी कापसाची काडी किंवा मऊ ब्रश वापरा. यामुळे नक्षीकामाला ओरखडे पडण्याचा धोका कमी होतो.
दिव्याच्या वात ठेवण्याच्या जागेत आणि कोपऱ्यांत काजळी साचते. ती काढण्यासाठी मऊ टूथब्रश किंवा छोटा स्वच्छ ब्रश वापरा. जोरात घासण्याऐवजी हलक्या हाताने स्वच्छ करा.
दिवे पूर्ण कोरडे झाल्यावरच ठेवून द्या. मातीच्या पणत्या एकमेकांवर ठेवताना मध्ये कागद ठेवा. पितळी समई कोरड्या मऊ कापडात गुंडाळून ठेवा. दिव्यांमध्ये जुने तेल किंवा वात साचू देऊ नका.