Shreya Maskar
१ एप्रिलपासून डिजिटल जगात मोठा बदल होणार आहे. UPI किंवा नेट बँकिंगचा तुम्ही वारंवार वापर करत असाल, तर सावध व्हा. भारतीय रिझर्व्ह बँकने (RBI) ऑनलाइन फसवणूक रोखण्यासाठी नवीन व्यवहार पद्धत सुरू केली आहे.
आरबीआयने आता टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनवर (2FA) लक्ष केंद्रित केले आहे. जे आता प्रत्येक लहान-मोठ्या डिजिटल पेमेंटसाठी अनिवार्य केले आहे.
पूर्वी अनेक ॲप्स एका क्लिकवर पैसे कापत असत, पण आता तुम्हाला तुमची ओळख दाखवण्यासाठी डबल सिक्योरिटी तपासणीतून जावे लागेल, ज्यामुळे अनावश्यक पेमेंट टाळता येतील.
नवीन नियमांनुसार, बँका आणि फिनटेक कंपन्यांना आता ग्राहकांना ऑथेंटिकेशन अनेक पर्याय देणे आवश्यक असेल. त्यात किमान एक घटक डायनॅमिक असणे आवश्यक आहे. डायनॅमिक म्हणजे सुरक्षा कोड प्रत्येक वेळी नवीन असेल आणि तो त्वरित तयार होईल.
बँका हे नियम लागू करण्यात हलगर्जीपणा करतील आणि एखाद्या ग्राहकाची फसवणूक होईल, तर आता संपूर्ण जबाबदारी बँक किंवा सेवा पुरवठादारावर असेल. आता पासवर्ड आणि पिनसोबतच, ओटीपी, बोटांचे ठसे यांसारखे बायोमेट्रिक्स किंवा हार्डवेअर टोकनचा समावेश असेल.
बहुतेक जण वर्षानुवर्षे तोच एक पिन नंबर वापरत आले आहेत, जो हॅकर्स सहजपणे शोधू शकत होते. पण आता प्रत्येक व्यवहारासाठी एक नवीन रिअल-टाइम कोड तयार केला जाईल. याचा अर्थ असा की, जरी कोणाला तुमचा पासवर्ड कळला, तरी ते तुमच्या खात्यात प्रवेश करू शकणार नाहीत.
आता तुम्ही कोणती सुरक्षा पद्धत निवडता हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून असेल. बँका विविध कॉम्बो ऑफर तुम्हाला देतील. उदा, तुम्ही तुमचा जुना पिन ओटीपीसोबत वापरू शकता किंवा तुम्ही बोटांच्या ठशांसह डिव्हाइस बाइंडिंगसारखा हाय-टेक पर्याय निवडू शकता.
टोकन बेस्ड ऑथेंटिकेशन आणि पासवर्ड हा देखील एक चांगला पर्याय आहे. ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या सोयीनुसार आवश्यक असलेली सेफ्टी निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मिळेल.