Shreya Maskar
मधुमेहींच्या हाता-पायावरील जखमा अनेकदा लवकर बऱ्या होत नाहीत. रक्तातील वाढत्या साखरेमुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात. परिणामी, जखमेपर्यंत ऑक्सिजन आणि आवश्यक पोषक घटक पोहोचू शकत नाहीत. तसेच पांढऱ्या रक्त पेशींचे कार्य मंदावते, ज्यामुळे जंतूंचा संसर्ग (इन्फेक्शन) सहज पसरतो. त्यामुळे हात-पाय स्वच्छ आणि कोरडे ठेवा.
आपले हात- पाय पावसाच्या पाण्यापासून दूर ठेवा. पायांना बुरशीजन्य संसर्गापासून वाचवण्यासाठी दररोज मोजे घाला आणि बदला. नियमितपणे पाय धुणे महत्त्वाचे आहे. तसेच प्लास्टिकचे बूट घालणे टाळा आणि ओल्या ठिकाणी अनवाणी चालणे टाळा.
पावसाळ्यात डेंग्यूचा प्रादुर्भाव अधिक असतो. मधुमेहींची रोगप्रतिकारशक्ती आधिच कमकुवत असते, त्यांच्या रक्तवाहिन्या नाजूक असतात आणि रक्तस्त्राव होण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे या गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना डेंग्यू होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यात घरा शेजारी पाणी साठून राहणार नाही याची काळजी घ्या.
पावसाळ्यात हवेतील जीवाणू अन्नावर वेगाने पसरतात. कोणतेही फळ किंवा भाजी खाण्यापूर्वी स्वच्छ धुवा आणि कोरडे करा. तुम्ही फळे- भाज्यांना लिंबाच्या रसात किंवा कोमट पाण्यात धुवू शकता. पावसाळ्यात होणाऱ्या आजारांपासून वाचण्यासाठी भरपूर पाणी प्या. प्रामुख्याने नारळाचे पाण्याचे सेवन करा. बाहेरचे खाणे टाळा.
तुमचे शरीर संवेदनशील असेल तर पावसाळ्यात सुती कपडे घाला. हे कपडे घाम आणि ओलावा अधिक लवकर शोषून घेतात. डेनिमचे कपडे घालणे टाळा.
तुमचे इन्सुलिन आणि औषधे त्यांची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी थंड, कोरड्या जागी साठवा. जर तुम्ही बाहेर पडत असाल तर अतिरिक्त औषधे, ग्लुकोजच्या गोळ्या सोबत करा. नियमित डायबिटीज तपासा.
पावसाळ्यात आपल्याला अनेक चटपटीत , मसालेदार, तेलकट पदार्थ खावेसे वाटतात, मात्र ते खाणे टाळा. यामुळे शरीरातील साखरेची पातळी वाढू शकते. हेल्दी पदार्थांचे आणि घरगुती पदार्थांचे सेवन करा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.