Shreya Maskar
जेव्हा स्वादुपिंड पुरेशा प्रमाणात इन्सुलिन तयार करत नाही किंवा शरीर त्या इंसुलिनचा योग्य प्रकारे वापर करू शकत नाही, तेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण वाढून मधुमेहाची समस्या उद्भवते. हे प्रामुख्याने अनुवांशिकता, लठ्ठपणा आणि बैठ्या जीवनशैलीमुळे उद्भवते.
जाड आणि गडद रंगाची त्वचा हे मधुमेहाचे सुरुवातीचे लक्षण असू शकते. त्वचेच्या या स्थितीला 'अकॅन्थोसिस नायग्रिकन्स' (acanthosis nigricans) म्हणतात. मान, कंबर, काख, गुडघे आणि कोपर यांवरील त्वचा तपकिरी, काळी किंवा राखाडी रंगाची दिसते.
सोरायसिस हा एक दीर्घकालीन त्वचारोग आहे, ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकार प्रणाली चुकून निरोगी पेशींवर हल्ला करते. यामुळे त्वचेच्या पेशींची वाढ खूप वेगाने होते, ज्यामुळे त्वचेवर लाल चट्टे, चंदेरी पांढरे खवले आणि तीव्र खाज सुटते. टाइप २ मधुमेह असलेल्या लोकांना सोरायसिस होण्याचा धोका जास्त असतो.
रक्तातील चरबीचे प्रमाण वाढल्यामुळे पापण्यांभोवती पिवळे उंचवटे दिसू लागतात, हे मधुमेहाचे लक्षण आहे. वैद्यकीय भाषेत याला 'झँथेलॅझ्मा' (Xanthelasma) म्हणतात.
डायबेटिक अल्सर म्हणजे मधुमेहाने ग्रस्त लोकांच्या पायावर किंवा तळव्यावर होणाऱ्या खुल्या जखमा. रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त झाल्यावर असे होते. नसा खराब झाल्यामुळे पायात बधीरपणा येतो, त्यामुळे दुखापत किंवा फोड आल्यास वेदना जाणवत नाहीत आणि या जखमा नंतर गंभीर अल्सरचे रूप घेतात.रक्तातील साखरेची पातळी वाढल्यामुळे जखमा लवकर बऱ्या होण्यास अडचण येते.
लघवीद्वारे शरीरातील अतिरिक्त साखर बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेत, शरीर ऊतींमधून पाणी खेचते. या तीव्र निर्जलीकरणामुळे त्वचा दीर्घकाळ कोरडी पडते. त्वचेला खूप खाज येते.
रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण जास्त असल्यामुळे यीस्ट आणि जिवाणूंच्या वाढ होते. ॲथलीट फूट, त्वचा लाल पडणे, सुजणे यांसारख्या समस्या उद्भवतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.