Decoding Abhang: ‘मन माझे चपळ न राहे निश्चळ’… ओव्हरथिंकिंग का होतं? संत तुकाराम महाराजांच्या एका अभंगात मिळेल उत्तर

Surabhi Jayashree Jagdish

संत तुकारामांचा अभंग

आज आपण सतत विचार करत राहण्याला ‘ओव्हरथिंकिंग’ म्हणतो. पण मनाची ही चंचल अवस्था संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगातून खूप आधीच शब्दांत मांडली आहे. मन एका जागी स्थिर राहत नाही, सतत काही ना काही विचारांकडे धावत राहतं, हे त्यांनी अगदी सहजपणे सांगितलंय. एवढंच नाही, तर मन असं का भटकतं आणि त्यातून सुटका करण्यासाठी शेवटी माणूस कोणत्या भावनेत जातो, हेही या अभंगातून दिसतं.

Tukaram Maharaj | saam tv

‘मन माझे चपळ न राहे निश्चळ’

संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘मन माझे चपळ न राहे निश्चळ, घडी एकी पळ स्थिर नाही.’ याचा साधा अर्थ असा की, आपलं मन एका क्षणासाठीही एका जागी स्थिर राहत नाही. ते सतत एका विचारातून दुसऱ्या विचाराकडे जात राहतं आणि याच अवस्थेला आजच्या भाषेत आपण ओव्हरथिंकिंगशी जोडतो.

restless mind | saam tv

मन सतत कुठे ना कुठे भटकत राहतं

मन शांत बसावं असं वाटत असलं, तरी ते सतत काही ना काही विचार करत राहतं. एखादी जुनी गोष्ट आठवते, पुढे काय होईल याचा विचार सुरू होतो किंवा एखादी इच्छा मनात घर करून बसते. त्यामुळे मन एका ठिकाणी न राहता सतत भटकत राहतं.

overthinking meaning | saam tv

‘धांव घाली पुढें इंद्रियांचे ओढी’

तुकाराम महाराज पुढे म्हणतात, ‘धांव घाली पुढें इंद्रियांचे ओढी, केले तडातोडी चित्त माझे.’ म्हणजे इंद्रियांना ज्या गोष्टींची ओढ वाटते, त्यांच्या मागे मन धावत राहतं. डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा या पाच इंद्रियांमधून आपल्याला सतत वेगवेगळे अनुभव मिळत असतात आणि त्यातून अनेक इच्छा मनात निर्माण होतात.

restless mind meaning | saam tv

इच्छा मनाला अस्वस्थ करतात

एखादी गोष्ट हवी असते, ती मिळाली नाही तर तिचाच विचार मनात सुरू राहतो. एखादी गोष्ट मिळाल्यानंतरही दुसऱ्या गोष्टीची इच्छा निर्माण होऊ शकते आणि मन पुन्हा तिच्यामागे धावू लागतं. त्यामुळे मनाला नेमकं काय हवं आहे, याचा विचार करत करत माणूस स्वतःच्याच विचारांमध्ये अडकून पडतो.

Marathi devotional literature | saam tv

मनावर नियंत्रण

आपलं मन का अस्वस्थ होतं, याची जाणीव झाली तरी ते लगेच शांत होत नाही. विचार थांबवायचे ठरवलं, तरी मन पुन्हा त्याच गोष्टीकडे वळतं. म्हणूनच मनाला समजून घेणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच त्याला शांत करण्याचा प्रयत्न करणंही महत्त्वाचं आहे.

Marathi Abhang | saam tv

‘धांवें मज दीना गांजियेलें’

या अवस्थेत तुकाराम महाराज नारायणाला म्हणतात, ‘आता तू उदास नव्हे नारायण, धांवें मज दीना गांजियेलें.’ म्हणजे, हे नारायणा, आता शांत राहू नकोस, माझ्या मदतीला धाव, कारण या अवस्थेमुळे मी त्रासलो आहे. अशी ते देवाकडे आर्त हाक देतात. मनाच्या या संघर्षात माणूस स्वतःच्या मर्यादा मान्य करून देवाकडे आधार मागतो, हा भाव या ओळींत दिसतो.

mental peace | saam tv

‘राहिलों मी आस धरूनि तुझी’

शेवटी तुकाराम महाराज म्हणतात, ‘तुका म्हणजे माझा न चले सायास, राहिलों मी आस धरूनि तुझी.’ म्हणजे माझे प्रयत्न आता पुरेसे पडत नाहीत, म्हणून मी तुझ्यावरच आशा ठेवून आहे, असा या ओळींचा भाव आहे. मनाच्या इच्छा आणि विचारांनी माणूस त्रासला की, सगळं काही स्वतःच्या नियंत्रणात ठेवण्याऐवजी देवावर विश्वास ठेवून स्वतःला त्याच्याकडे सोपवणं, हा समर्पणाचा भाव यातून दिसतो.

controlling thoughts | saam tv

Mahabharata: महाभारतात शकुनीचा वध कोणी केला?

Who killed Shakuni | saam tv
येथे क्लिक करा