Shruti Vilas Kadam
मराठी चित्रपटसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेत्री दया डोंगरे यांचं नुकतंच निधन झालं असून, त्यांच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
दूरदर्शनवरील ‘गजरा’ या मालिकेतून दया डोंगरे घराघरात पोहोचल्या. या मालिकेने त्यांच्या अभिनयाला नवी ओळख मिळवून दिली.
अभिनयाव्यतिरिक्त, त्या एक प्रतिभावान गायिका देखील होत्या ज्या सुरुवातीला संगीतात करिअर करु इच्छित होत्या.
‘खट्याळ सासू नाठाळ सून, नवरी मिळे नवऱ्याला, नकाब, चार दिवस सासूचे, कुलदीपक, लालची अशा चित्रपटांमध्ये त्यांनी खाष्ट आणि कजाग सासूच्या भूमिका प्रभावीपणे साकारल्या.
त्यांनी केवळ मराठीच नव्हे, तर हिंदी चित्रपटांमध्येही लक्षवेधी भूमिका केल्या आणि अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं.
नाटक, दूरदर्शन आणि चित्रपट या तिन्ही माध्यमांत त्यांनी यशस्वी कारकीर्द घडवली. त्यांच्या आवाजात आणि अभिनयात असलेली ताकद प्रेक्षकांना भावायची. दया डोंगरे यांना कलात्मक वातावरण पिढीजात लाभलेले होते. त्यांच्या आई यमुताई मोडक या नाट्यकलाकार, तर आत्या शांता मोडक या सुप्रसिद्ध गायिका होत्या.
त्यांच्या निधनाने एक काळ संपला असला, तरी त्यांच्या दमदार भूमिकांमुळे दया डोंगरे मराठी प्रेक्षकांच्या मनात सदैव जिवंत राहतील.