Shruti Vilas Kadam
रोज १० हजार पावले चालण्याचा नियम डॉक्टरांनी सांगितलेला नाही. १९६० च्या दशकात जपानमध्ये चालण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी एका कंपनीने पावले मोजणाऱ्या मशीनची जाहिरात केली. यातून १० हजार पावलांचा आकडा लोकप्रिय झाला. पुढे जगभरातील लोक हा नियम पाळू लागले.
निरोगी राहण्यासाठी रोज १० हजार पावले चालले पाहिजेत असे नाही. दिवसाला ७ हजार पावले चालले तरी शरीराला चांगला फायदा होतो. यामुळे हृदय निरोगी राहण्यास आणि आजारांचा धोका कमी होण्यास मदत होते.
तरुण व्यक्ती: रोज ८ ते १० हजार पावले चालू शकतात. ४० ते ६० वयोगट: रोज ७ ते ९ हजार पावले चालण्याचा प्रयत्न करावा. ६० वर्षांवरील व्यक्ती: शरीराच्या क्षमतेनुसार ६ ते ८ हजार पावले चालावीत. चालण्याची सवय नसलेल्यांनी: सुरुवातीला ३ ते ४ हजार पावले चालावीत.
दररोज चालल्याने शरीर निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यास मदत होते. हृदय निरोगी राहते. वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. तणाव कमी होतो. रात्री चांगली झोप लागते.
तुम्हाला रोज चालण्याची सवय नसेल, तर सुरुवातीलाच १० हजार पावले चालण्याचा प्रयत्न करू नका. त्यामुळे थकवा आणि पाय दुखण्याची समस्या होऊ शकते. सुरुवातीला कमी पावले चाला आणि हळूहळू रोज ५०० ते १ हजार पावले वाढवा.
चालण्यासाठी आरामदायी शूज वापरा. पुरेसे पाणी प्या. सुरुवातीला हळू चाला आणि नंतर वेग वाढवा. रोज ठरावीक वेळी चालण्याची सवय लावा. दिवसभर एकाच जागी बसून राहू नका. सकाळी किंवा संध्याकाळी चालण्यासाठी वेळ काढा.
निरोगी राहण्यासाठी रोज १० हजार पावले चालणे गरजेचे नाही. त्यापेक्षा दररोज थोडा वेळ चालणे जास्त महत्त्वाचे आहे. सुरुवातीला कमी चाला आणि हळूहळू चालण्याचा वेळ वाढवा. तुम्हाला हृदयविकार किंवा सांधेदुखीचा त्रास असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.