Surabhi Jayashree Jagdish
वजन कमी करण्यासाठी घरगुती उपायांमध्ये जीरा वॉटर आणि चीया सिड्स वॉटर हे दोन पर्याय वापरले जातात. दोन्ही पेय शरीरातील मेटाबॉलिझम सुधारण्यास आणि पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करतात. मात्र यापैकी कोणतं ड्रिंक फायदेशीर ठरतं ते पाहूयात.
जिऱ्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि आयर्न मोठ्या प्रमाणात आढळतात, जे शरीराला ऊर्जा देण्यास मदत करतात. त्यामध्ये असलेले नैसर्गिक तेल पचनक्रिया सुधारण्याचं काम करतं आणि शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतं. दुसरीकडे, चीया सिड्समध्ये फायबर, ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे शरीराला दीर्घकाळ पोषण मिळतं.
जीरा वॉटर शरीराचा मेटाबॉलिझम नैसर्गिकरित्या वाढवण्यास मदत करतं. हे ड्रिंक पोटातील गॅस आणि अपचन कमी करण्यासाठी उपयुक्त मानलं जातं. तसंच रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत होत असल्यामुळे अनावश्यक भूक कमी होऊ शकते.
चीया सिड्स पाण्यात भिजवल्यानंतर फुगतात आणि पोट भरल्याची भावना निर्माण करतात. त्यातील जास्त फायबरमुळे वारंवार भूक लागणं आणि स्नॅकिंगची सवय कमी होऊ शकते. त्यामधील प्रोटीन वजन कमी करताना स्नायू टिकवून ठेवण्यास मदत करतं.
जीरा वॉटर सकाळी रिकाम्या पोटी पिणं अधिक फायदेशीर मानलं जातं. यामुळे शरीराची पचनक्रिया दिवसाच्या सुरुवातीलाच एक्टिव्ह होण्यास मदत मिळते. नियमित सेवन केल्यास शरीरातील टॉक्सिन घटक बाहेर टाकण्यासही मदत होऊ शकते.
चीया सिड्स वॉटर मधल्या वेळेत किंवा जेवणापूर्वी पिणं अधिक प्रभावी ठरतं. हे ड्रिंक पोट भरल्याची भावना देत असल्यामुळे जास्त खाण्याची सवय कमी होऊ शकते. त्यामुळे कॅलरीचं प्रमाण नियंत्रित राहतं.
जर तुमचा मुख्य उद्देश पचन सुधारणं आणि मेटाबॉलिझम वाढवणं असेल तर जीरा वॉटर अधिक फायदेशीर ठरू शकते. पण दीर्घकाळ भूक नियंत्रणात ठेवून वजन कमी करायचे असल्यास चीया सिड्स वॉटर अधिक प्रभावी मानलं जातं.