Shreya Maskar
दिवाळीच्या फराळात शंकरपाळी खुसखुशीत, कुरकुरीत आणि छान फुललेली हवी असेल, तर पीठ मळताना एक खास ट्रिक वापरून पाहा.
खुसखुशीत शंकरपाळी बनवण्यासाठी मैदा, साखर, तूप किंवा तेल , दूध, मीठ आणि वेलची पूड इत्यादी साहित्य लागते.
खुसखुशीत शंकरपाळी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये साखर आणि दूध एकत्र करून साखर पूर्ण विरघळवून घ्या. मोठ्या परातीत मैदा घ्या. त्यात चिमूटभर मीठ आणि वेलची पूड घाला.
तूप किंवा तेल गरम करून मैद्यामध्ये घाला. हे गरम मोहन हाताने मैद्यात व्यवस्थित चोळून मिसळा.
आता साखरेचे दूध थोडेथोडे घालत घट्टसर पीठ मळून घ्या. पीठ खूप मऊ करू नका. मळलेले पीठ झाकून साधारण २० ते ३० मिनिटे बाजूला ठेवा.
त्यानंतर पिठाचा गोळा घेऊन जाडसर पोळी लाटा. सुरी किंवा कटरच्या मदतीने लांबट किंवा चौकोनी आकारात शंकरपाळी कापून घ्या.
कढईत तेल गरम करा. तेल खूप कडकडीत गरम नसावे. शंकरपाळी मध्यम ते मंद आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यात साठवून ठेवा.
मैद्याच्या पिठात गरम मोहन घालून ते हाताने चांगले चोळून घ्या. मोहन योग्य प्रमाणात मिसळल्यास शंकरपाळी खुसखुशीत होण्यास मदत होते.