Sakshi Sunil Jadhav
नाश्त्याला रोजचे पोहे, उपमा खाऊन कंटाळला असाल तर बटाट्याचे कुरकुरीत आणि चविष्ट पॅनकेक्स नक्कीच बनवा. चला याची रेसिपी जाणून घेऊयात.
बटाटे, बारीक चिरलेला कांदा, तांदळाचं पीठ, बारीक चिरलेली हिरवी मिरची, जिरं, चवीनुसार मीठ, काळी मिरी पूड, बारीक चिरलेली कोथिंबीर, तेल किंवा बटर इत्यादी साहित्य पुरेसं आहे.
सर्वप्रथम बटाटे सोलून स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्यांचा बारीक किस करून काही वेळ पाण्यात ठेवा.
किसलेले बटाटे पाण्यातून बाहेर काढून त्यातील जास्तीचं पाणी हाताने दाबून बाहेर काढा. त्याने पॅनकेक्स जास्त कुरकुरीत होतील.
एका मोठ्या भांड्यात किसलेले बटाटे, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि जिरं व्यवस्थित मिक्स करून घ्या.
आता त्या मिश्रणात तांदळाचं पीठ, मीठ आणि काळी मिरी पूड घालून सर्व साहित्य पुन्हा मिक्स करा.
गॅसवर तवा ठेवून तो गरम करून घ्या. मग त्यावर थोडं तेल किंवा बटर लावून पसरवा. मग तयार मिश्रणाचं छोटे गोळे तव्यावर ठेवून चमच्याच्या मदतीने किंवा हाताने हलकेच दाबून गोल आकार द्या.
पॅनकेक्स मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत शेकून घ्या. मग तयार पोटॅटो पॅनकेक्स टोमॅटो सॉस, दही किंवा आवडीच्या चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करून घ्या.