Shreya Maskar
तुमच्याही घरात झुरळांचा सुळसुळाट झाला असेल तर हा रामबाण घरगुती उपाय करा. किचन, बाथरूम, सिंकखाली किंवा कपाटांमध्ये झुरळे दिसू लागली की आपल्याला त्रास होतो.
झुरळांमुळे अन्न दूषित होते. झुरळांच्या विष्ठेमुळे ॲलर्जी व दमा वाढू शकतो. त्यामुळे झुरळे दिसताच त्यांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी योग्य उपाय करणे महत्त्वाचे आहे.
तमालपत्राचा वास झुरळांना दूर ठेवण्यास मदत करतो. कपाटांच्या कोपऱ्यांमध्ये आणि कोरड्या जागी तमालपत्र ठेवा. ते वेळोवेळी बदला.
ओट्यावर सांडलेले तेल, साखर, चहाचे थेंब आणि अन्नाचे कण झुरळांसाठी खाद्य ठरू शकतात.ओटा, गॅसजवळील जागा आणि कपाटांचे बाहेरील भाग साबणाच्या पाण्याने स्वच्छ पुसा.
झुरळे कपाटांच्या मागे, पाइपच्या भोवती आणि भिंतींच्या लहान फटींमध्ये लपतात, त्यामुळे वेळीच सीमेंटने या फटी बंद करा. यामुळे झुरळांना लपण्यासाठी आणि घरात प्रवेश करण्यासाठी जागा मिळत नाही.
सिंकमध्ये साचलेले अन्नकण, तेलकटपणा आणि ओलावा झुरळांना आकर्षित करतो. त्यामुळे किचन स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. रात्री झोपण्यापूर्वी सिंक स्वच्छ करा, भांडी धुऊन ठेवा आणि शक्य असल्यास नाल्याला योग्य झाकण किंवा जाळी लावा.
उघडे अन्न, साखर, बिस्किटांचे तुकडे आणि धान्य यांमुळे घरात झुरळांची संख्या वाढते. पीठ, तांदूळ, साखर आणि इतर खाद्यपदार्थ हवाबंद डब्यांत ठेवा. कचरा रोज बाहेर टाका आणि डब्याला झाकण लावा.
गळणारे नळ, ओले कापड आणि सतत ओलसर राहणारे सिंकखालचे कप्पे झुरळांना पाणी उपलब्ध करून देतात. गळती दुरुस्त करा, वापरानंतर सिंक कोरडे पुसा. संपूर्ण घर विशेषता किचन कोरडे ठेवा.