Sakshi Sunil Jadhav
घराघरात रोज चपाती बनवली जाते. म्हणून गृहीणी आधीच कणिक मळून ठेवतात. पण सकाळी मळलेलं पीठ संध्याकाळपर्यंत सुकतं, घट्ट होतं किंवा त्याला आंबूस वास येतो.
खराब कणकेमुळे चपात्या कडक होतात आणि चवही बिघडते. पण काही सोप्या आणि घरच्या घरी करता येणाऱ्या उपायांनी चपातीचे पीठ जास्त वेळ ताजं, मऊ आणि वापरण्यायोग्य ठेवता येतं. चला जाणून घेऊयात.
पीठ मळताना कोमट पाण्याचा वापर करा. कोमट पाण्यामुळे कणिक मऊ होतं आणि ओलावा जास्त काळ टिकतो.
पीठ मळताना थोडसं दूध घाला. त्याने चपात्या मऊ राहतात आणि कणिकही जास्त वेळ ताजी राहते. विशेषतः काही तासांसाठी पीठ ठेवायचं असेल तर हा उपाय योग्य ठरतो.
कणिक मळल्यानंतर त्यावर थोडेसं तेल किंवा तूप लावा. यामुळे पीठावर कोरडी पापुद्री तयार होत नाही आणि ओलावा टिकून राहतो.
पीठ नेहमी हवाबंद डब्यातच ठेवा. उघड्यावर ठेवलेली कणिक पटकन सुकते आणि खराब होते.
फ्रीजमध्ये पीठ ठेवताना त्यावर ओलसर कापड किंवा टिश्यू पेपर ठेवा. यामुळे कणिक कोरडी पडत नाही आणि वासही येत नाही.
पीठ मळताना फार जास्त घट्ट किंवा फार सैल मळू नका. योग्य प्रमाणात मऊ कणिक मळल्यास ती जास्त वेळ चांगली राहते.
पीठ ठेवताना त्यात मीठ आधीच जास्त घालू नका. मीठामुळे कणिक लवकर पाणी सोडतं आणि खराब होण्याची शक्यता वाढते.