ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
माउंट मेरी चर्च हे मुंबईतील बांद्रा येथे असलेले प्रसिध्द ख्रिस्ती तीर्थस्थान आहे. हे चर्च ‘बॅसिलिका ऑफ अवर लेडी ऑफ द माउंट’ या नावानेही ओळखले जाते.
हे चर्च बांद्रा पश्चिमेकडील टेकडीवर वसलेले आहे. येथून समुद्राचे सुंदर दृश्य दिसते, त्यामुळे हे ठिकाण पर्यटकांनाही अधिक आकर्षित करते.
माउंट मेरी चर्चची स्थापना 1640 साली पोर्तुगीजांनी केली. काळानुसार चर्चचे नूतनीकरण झाले, पण त्याचे ऐतिहासिक महत्त्व आजही टिकून आहे.
या चर्चमध्ये व्हर्जिन मेरी (मदर मेरी) यांची सुंदर मूर्ती आहे. अनेक भाविक येथे नवस बोलतात व इच्छा पूर्ण झाल्यावर पुन्हा दर्शनासाठी येतात.
दरवर्षी सप्टेंबर महिन्यात बांद्रा फेअर भरते. ही जत्रा व्हर्जिन मेरीच्या जन्मदिनानिमित्त ८ दिवसांची भरते. या जत्रेत सर्व धर्मांचे लोक सहभागी होतात आणि विविध वस्तूंची खरेदी करतात.
ख्रिसमसच्या काळात माउंट मेरी चर्च विशेष सजवले जाते. तसेच मोठ्या प्रमाणात रोषणाई केली जाते. येथील शांत वातावरणामुळे वेगळीच भक्तिमय ऊर्जा मिळते. ख्रिसमसच्या निमित्ताने येशूच्या जन्माचे देखावे सादर केले जातात.
चर्चची वास्तुकला साधी पण आकर्षक आहे. टेकडीवरील शांत वातावरण, मेणबत्त्यांचा उजेड आणि समुद्राची हवा मनाला प्रसन्न करते.
हे चर्च बांद्रा येथे असून बांद्रा रेल्वे स्थानकावर उतरावे. रेल्वे स्थानकाच्या बाहेर येताच बस किंवा रिक्षा करुन तुम्ही चर्च जवळ सहज पोहचता. बँडस्टँड परिसरात मुंबईतील अनेक दिग्गज लोक येथे राहतात.
चर्चमध्ये दर्शनासाठी जाण्याकरिता सकाळ किंवा संध्याकाळी जावे. तसेच तेथे गेल्यावर शांतता आणि स्वच्छता राखावी.