Surabhi Jayashree Jagdish
दिवसभराच्या धावपळीमुळे शरीराला थकवा जाणवणं सामान्य आहे मात्र रात्री वारंवार होणारा श्वासाचा त्रास किंवा अचानक जाग येणं वेगळे संकेत असू शकतात. हृदयाची पंपिंग क्षमता कमी झाल्यास शरीरात आणि विशेषतः फुफ्फुसांमध्ये द्रव साचण्याची शक्यता वाढते.
हार्ट अटॅक म्हणजे हृदयाच्या स्नायूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीत अडथळा निर्माण होऊन हृदयाच्या स्नायूला इजा होणं. हार्ट फेलियरमध्ये हृदय शरीराच्या गरजेनुसार पुरेसे रक्त पंप करू शकत नाही आणि ही स्थिती हळूहळू होऊ शकते.
झोपल्यानंतर काही वेळाने अचानक धाप लागून जाग येणे याला Paroxysmal Nocturnal Dyspnea (PND) म्हणतात. अशावेळी व्यक्तीला बसावं किंवा उभे राहावेसं वाटू शकतं आणि बसल्यानंतर श्वास घेणं तुलनेने सोपं वाटू शकतं.
काही व्यक्तींना आडवं झोपल्यावर श्वास घेण्यास त्रास होतो आणि बसल्यावर किंवा उंच उशी घेतल्यावर आराम मिळतो. या स्थितीला Orthopnea म्हणतात आणि ती हृदयाच्या कार्यक्षमतेशी संबंधित असू शकते.
हृदयाची पंपिंग क्षमता कमी झाल्यास फुफ्फुसांमध्ये द्रव साचू शकतो आणि त्यामुळे खोकला किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. काही गंभीर परिस्थितींमध्ये गुलाबी किंवा फेसाळ कफही दिसू शकतो.
झोपताना अचानक हृदय जोरात किंवा वेगाने धडधडत असल्याचं जाणवून झोपमोड होऊ शकते. धडधड ही हृदयाच्या ठोक्यांमधील बदल, ताण, कॅफिन किंवा काही इतर कारणांमुळेही होऊ शकते. मात्र त्यासोबत छातीत दुखणं, चक्कर येण, बेशुद्ध पडण्यासारखं वाटणं किंवा तीव्र श्वासोच्छवासाचा त्रास असल्यास डॉक्टरांची मदत घ्यावी.
रात्री वारंवार धाप लागणं, आडवं झाल्यावर श्वास घेण्यास त्रास होणं किंवा अचानक तीव्र त्रास होणं याकडे दुर्लक्ष करू नका. छातीत दडपण किंवा वेदना, तीव्र श्वासोच्छवासाचा त्रास, थंड घाम, मळमळ, चक्कर किंवा बेशुद्धी यांसारखी लक्षणं अचानक सुरू झाल्यास हार्ट अटॅकची शक्यता लक्षात घेऊन तातडीची वैद्यकीय मदत घ्यावी.
ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.