Surabhi Jayashree Jagdish
उच्च रक्तदाब हळूहळू विकसित होतो आणि त्यामागे आनुवंशिकता तसंच जीवनशैली हे दोन्ही महत्त्वाचे घटक असतात. रक्तवाहिन्यांवर सतत वाढणारा दाब त्यांना कमी लवचिक बनवतो आणि त्यामुळे रक्तदाब कायम वाढलेला राहू शकतो.
जास्त मीठ, प्रक्रिया केलेले अन्न आणि फास्ट फूडचं वाढलेलं सेवन हे महत्त्वाचं कारण मानलं जातंय. दिवसभर बसून काम करणं, व्यायामाचा अभाव आणि वाढता स्थूलपणाही रक्तदाब वाढवतात.
दीर्घकाळ मानसिक ताण, स्क्रीनसमोर जास्त वेळ घालवणं आणि अनियमित लाईफस्टाईल याचा तरुणांच्या आरोग्यावर परिणाम होतो. जंक फूड, शुगर ड्रिंक्स आणि कमी शारीरिक हालचाल यामुळे लठ्ठपणा वाढून रक्तदाब वाढण्याची शक्यता वाढते.
वारंवार सकाळी उठल्यावर डोकेदुखी होणं हे काही लोकांमध्ये उच्च रक्तदाबाचं लक्षण असू शकतं. मात्र, बहुतेक रुग्णांमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही स्पष्ट लक्षणं दिसत नाहीत. त्यामुळे उच्च रक्तदाबाला "सायलेंट किलर" म्हटलं जातं.
नियमितपणे डिजिटल किंवा मॅन्युअल रक्तदाब मापकाने रक्तदाब तपासणं हाच उत्तम पर्याय आहे. विशेषतः कुटुंबात रक्तदाबाचा इतिहास असल्यास किंवा वय १८ वर्षांपेक्षा जास्त असल्यास नियमित तपासणी करणं आवश्यक आहे.
दररोज किमान ३० मिनिटं चालणं किंवा इतर मध्यम तीव्रतेचा व्यायाम करणं, मिठाचं प्रमाण कमी ठेवणं आणि संतुलित आहार घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पुरेशी झोप घेणं, ताण नियंत्रणात ठेवणं आणि धूम्रपान व मद्यपान टाळणं यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
रक्तदाब दीर्घकाळ नियंत्रित न राहिल्यास हार्ट अटॅक, स्ट्रोक, किडनीशी नुकसान आणि दृष्टीवर परिणाम होण्याचा धोका वाढतो. वेळेवर निदान, नियमित तपासणी आणि निरोगी जीवनशैली हेच उच्च रक्तदाबापासून बचावाचे उत्तम उपाय आहेत.
ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.