Surabhi Jayashree Jagdish
स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमती सतत वाढतायत. शिवाय सध्या युद्धाचा परिणाम देखील गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर होतोय. त्यामुळे अनेक घरांमध्ये LPG सिलिंडरवर पूर्णपणे अवलंबून राहणं धोकादायक ठरू शकतं.
शहरांमध्ये अजूनही स्वयंपाकासाठी गॅसच मुख्य इंधन आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते घरांमध्ये पर्यायी व्यवस्था ठेवणं शहाणपणाचं आहे. वीजेवर चालणारी उपकरणं किंवा इतर काही पर्यायांमुळे गॅसची गरज कमी करता येऊ शकते.
LPG ला पर्याय म्हणून इंडक्शन हा एक उत्तम पर्याय मानला जातो. हे उपकरण वीजेवर चालतं आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऊर्जेच्या साहाय्याने भांडी गरम करतं. यामुळे स्वयंपाक जलद होतो आणि ऊर्जा वाया जाण्याची शक्यता कमी असते.
आधुनिक स्वयंपाकघरांमध्ये इलेक्ट्रिक प्रेशर कुकरचा वापर झपाट्याने वाढताना दिसतो. एका उपकरणात भात, डाळ, भाजी किंवा बिर्याणी यांसारखे अनेक पदार्थ सहज शिजवता येतात. यामध्ये प्रेशर कुकिंग, स्टीमिंग आणि स्लो कुकिंगसारख्या अनेक सुविधा एकत्र असतात.
सोलर कुकर हा पूर्णपणे इंधनमुक्त स्वयंपाकाचा पर्याय आहे. सूर्यप्रकाशाचा उपयोग करून अन्न शिजवलं जातं. त्यामुळे वीज किंवा गॅसची आवश्यकता नसते. एकदा बसवल्यानंतर त्याचा वापर खर्चिक नसतो आणि पर्यावरणासाठीही हा अतिशय चांगला पर्याय मानला जातो.
स्वयंपाकघरातील उरलेला कचरा, शेतीतील अवशेष किंवा जनावरांचं शेण यापासून बायोगॅस तयार करता येतो. ज्यांच्या घरी बाग, शेती किंवा पशुधन आहे ते लहान बायोगॅस युनिट बसवून स्वयंपाकासाठी इंधन तयार करू शकतात.
एअर फ्रायर आणि मायक्रोवेव्ह ओव्हन हे पूर्णपणे गॅसची जागा घेऊ शकत नसले तरी गॅसचा वापर कमी करण्यात ते खूप मदत करतात. अन्न गरम करणं, बेकिंग किंवा जलद पदार्थ तयार करणं यासाठी ही उपकरणं उपयोगी ठरतात.