Shreya Maskar
हिवाळा सुरू झाला की आहारात उष्णता देणारे आणि पौष्टिक पदार्थ खाण्याला विशेष महत्त्व दिले जाते. अशा दिवसांत गरमागरम बाजरीची भाकरी आवर्जून खा.
बाजरीमध्ये फायबर, प्रथिने, लोह आणि मॅग्नेशियम यांसारखे पोषक घटक असतात, ज्यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते. बाजरीमध्ये फायबर असल्यामुळे पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यास मदत होऊ शकते.
बाजरीची भाकरी बनवण्यासाठी बाजरीचे पीठ, कोमट पाणी , चवीनुसार मीठ, तूप किंवा लोणी इत्यादी साहित्य लागते.
बाजरीची भाकरी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका परातीत बाजरीचे पीठ घ्या. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा. आता थोडे थोडे कोमट पाणी घालत पीठ मळायला सुरुवात करा. बाजरीचे पीठ मऊ आणि एकसंध होईपर्यंत हाताने चांगले मळून घ्या. पीठ खूप घट्ट किंवा खूप पातळ ठेवू नका.
आता पिठाचा मध्यम आकाराचा गोळा तयार करा. परातीवर किंवा स्वच्छ प्लास्टिक शीटवर थोडे बाजरीचे पीठ भुरभुरा. हाताला पाणी लावून गोळा हळूहळू थापत गोलाकार भाकरी तयार करा.
गॅसवर तवा गरम करून त्यावर भाकरी अलगद टाका. एका बाजूने थोडी भाजल्यानंतर भाकरी उलटा. आता वरच्या बाजूला थोडे पाणी लावून हाताने किंवा चमच्याने हलके पसरवा.
भाकरी दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजून घ्या. शक्य असल्यास शेवटी मंद आचेवर थेट गॅसवर हलकी भाजा. त्यामुळे भाकरी छान फुलते आणि आतूनही शिजते.
तयार बाजरीच्या भाकरीवर थोडे साजूक तूप किंवा लोणी लावा. गरमागरम भाकरी हिरव्या मिरचीचा ठेचा, पिठलं, वांग्याचे भरीत किंवा लसूण चटणीसोबत सर्व्ह करा.