Surabhi Jayashree Jagdish
सतत पाय सुजणं ही साधी समस्या नसून शरीरात द्रव साचत असल्याचा संकेत असू शकतो. अनेकदा लोक याकडे दुर्लक्ष करतात, पण हे गंभीर आजारांचं लक्षण असू शकतं. यामागे कोणत्या समस्या आहेत ते पाहूयात.
हृदय नीट काम करत नसेल तर शरीरात रक्ताचा प्रवाह कमी होतो आणि पायांमध्ये द्रव साचू लागतो. त्यामुळे पाय, टाच आणि पायाची बोटे सुजतात. ही सूज सहसा संध्याकाळी वाढते.
किडनी शरीरातील अतिरिक्त पाणी बाहेर टाकण्याचं काम करते. पण ती नीट काम न केल्यास द्रव शरीरात साठतो. यामुळे पाय आणि चेहऱ्यावर सूज दिसू शकते. ही स्थिती गंभीर असू शकते.
लिव्हर खराब झाल्यास शरीरातील प्रोटीनचं संतुलन बिघडतं आणि द्रव साचायला लागतो. त्यामुळे पाय आणि पोट दोन्ही ठिकाणी सूज येऊ शकते. सिरोसिससारख्या आजारांमध्ये ही समस्या जास्त दिसते.
पायातील शिरा (veins) नीट काम करत नसल्यास रक्त हृदयापर्यंत जात नाही. त्यामुळे पायांमध्ये रक्त आणि द्रव साचून सूज येते. हा प्रकार विशेषतः जास्त वेळ उभं राहणाऱ्या किंवा बसणाऱ्या लोकांमध्ये दिसून येतो.
पायातील रक्ताच्या गाठीमुळे अचानक सूज येऊ शकते. ही स्थिती धोकादायक असू शकते. कारण गाठ फुटली तर ती इतर अवयवांमध्ये जाऊ शकते. एका पायातच सूज, वेदना किंवा लालसरपणा दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
लिम्फॅटिक सिस्टीममध्ये अडथळा आल्यास शरीरातील द्रव बाहेर पडत नाही. त्यामुळे पाय कायम सुजलेले राहू शकतात. ही समस्या दीर्घकाळ टिकणारी असते. वेळीच उपचार न घेतल्यास ही समस्या वाढू शकते.