Surabhi Jayashree Jagdish
अतिप्रमाणात मीठ खाल्ल्यामुळे शरीरात सोडियमचं प्रमाण वाढतं आणि पाण्याची संतुलन प्रक्रिया बिघडते. यामुळे शरीरात सूज, डिहायड्रेशन आणि रक्तदाब वाढणं अशा समस्या निर्माण होऊ शकतात.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार प्रौढांनी दिवसाला सुमारे ५ ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाऊ नये. ही मर्यादा वारंवार ओलांडल्यास हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. जर तुम्हाला शरीरात ही लक्षणं दिसत असतील तर समजा तुम्ही जास्त प्रमाणात मीठ खाताय.
अतिमीठ सेवनामुळे शरीरात पाणी साठवलं जातं आणि पोट फुगल्यासारखं वाटतं. ही स्थिती शरीरात सोडियम कमी करण्यासाठी पाणी रोखल्यामुळे होते. त्यामुळे पोट जड आणि ताणलेलं जाणवू शकतं.
जास्त मीठ खाल्ल्याने शरीरात पाण्याची साठवण वाढते आणि सूज निर्माण होते. विशेषतः पाय, घोटे आणि हातांमध्ये फुगवटा दिसून येतो. ही स्थिती वैद्यकीय भाषेत Edema म्हणून ओळखली जाते.
अतिरिक्त सोडियम शरीरातील पाण्याचं संतुलन बिघडवतं आणि त्यामुळे सतत तहान लागते. शरीर सोडियम कमी करण्यासाठी अधिक पाण्याची मागणी करते. त्यामुळे तुम्ही वारंवार पाणी पिण्याकडे वळता.
अतिमीठामुळे रक्तदाब वाढतो आणि त्यामुळे डोकेदुखी होऊ शकते. शरीरातील द्रव संतुलन बिघडल्याने डिहायड्रेशन होऊन डोकं जड वाटतं. मेंदूतील पाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे वेदना निर्माण होऊ शकतात.