Surabhi Jayashree Jagdish
हार्ट अटॅक म्हटलं की छातीत तीव्र दुखणं, घाम येणं आणि अस्वस्थ वाटणं अशी लक्षणं आपल्या डोळ्यासमोर येतात. मात्र प्रत्येक हार्ट अटॅकवेळी अशी ठराविक आणि तीव्र लक्षणं जाणवतातच असं नाही. काही वेळा हार्ट अटॅक येऊनही व्यक्तीला छातीत तीव्र वेदना किंवा स्पष्ट लक्षणं जाणवत नाहीत. अशा प्रकाराला Silent Heart Attack म्हणतात.
मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये सायलेंट हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो. अशा वेळी हार्ट अटॅकची नेहमी दिसणारी तीव्र लक्षणं जाणवतीलच असं नाही. त्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींनी शरीरात होणारे असामान्य बदल दुर्लक्षित करू नयेत.
उच्च रक्तदाब म्हणजेच हाय ब्लड प्रेशर असलेल्या लोकांनाही सायलेंट हार्ट अटॅकचा धोका अधिक असू शकतो. रक्तदाबाची समस्या दीर्घकाळ राहिल्यास हृदयाशी संबंधित धोके वाढू शकतात. त्यामुळे नियमित तपासणी आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रक्तदाब नियंत्रणात ठेवणं महत्त्वाचं आहे.
वय वाढल्यानंतर हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे ज्येष्ठ व्यक्तींमध्ये सायलेंट हार्ट अटॅक होण्याची शक्यता तुलनेने अधिक असू शकते. छातीत हलका दबाव, अचानक थकवा किंवा श्वास घेण्यास त्रास जाणवल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये.
रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी जास्त असणाऱ्या व्यक्तींनाही सायलेंट हार्ट अटॅकचा धोका अधिक असतो. अशा लोकांनी कोलेस्ट्रॉलची नियमित तपासणी करून ते नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करावा. आहार, व्यायाम आणि डॉक्टरांनी सांगितलेली औषधं याकडे योग्य लक्ष देणं गरजेचं आहे.
दिवसभर फारशी शारीरिक हालचाल न करणाऱ्या किंवा बैठे जीवनशैली असलेल्या लोकांमध्ये हृदयाशी संबंधित धोके वाढू शकतात. नियमित व्यायाम किंवा शारीरिक हालचालींचा अभाव हा हृदयाच्या आरोग्यासाठी चांगला मानला जात नाही.
कुटुंबातील जवळच्या व्यक्तींना हार्ट अटॅकचा इतिहास असल्यास स्वतःच्या हृदयाच्या आरोग्याबाबत अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. अशा व्यक्तींमध्ये हृदयाशी संबंधित काही जोखीम घटक असू शकतात.
ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.