Surabhi Jayashree Jagdish
टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंह याचे वडील योगराज सिंह अडचणीत आलेत. प्राइम व्हिडिओवर प्रसारित झालेल्या 'लुक्खे' नावाच्या वेब सीरिजमधील एका आक्षेपार्ह संवादामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
या संवादाबद्दल त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला असून, त्यांना माफी मागण्यास सांगण्यात आले आहे. महिलांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारी आक्षेपार्ह विधाने केल्याबद्दल चंदीगड पोलिसांनी त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे.
व्हायरल झालेली व्हिडिओ क्लिप 'लुक्खे' या वेब सीरिजमधील आहे. या व्हिडिओमध्ये योगराज सिंग महिलांबद्दल अश्लील आणि अपमानजनक टिप्पणी करताना दिसतायत.
"जननी दिन में चुल्हे पे, रात को..." या संवादामुळे मोठा वाद होण्याची शक्यता आहे. उज्ज्वल भसीन आणि जतीन वर्मा या दोन वकिलांनी या क्लिपच्या आधारे तक्रार दाखल केली आहे.
तक्रार १२ मे रोजी दाखल करण्यात आली होती. चंदीगडमधील सेक्टर ३६ पोलीस ठाण्यात गुरुवारी एफआयआर नोंदवण्यात आला. पंजाब महिला आयोगानेही पंजाब पोलिसांना सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.
ज्या वादग्रस्त संवादामुळे हा वाद निर्माण झाला, तो ८ मे २०२६ रोजी प्रदर्शित झालेल्या एका वेब सीरिजमध्ये समाविष्ट होता. नंतर तो वेब सीरिजमधून काढून टाकण्यात आला.
तक्रारदारांचे म्हणणे आहे की, १७ सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये महिलांविरोधात अपमानजनक भाषेचा वापर करण्यात आला आहे आणि त्याचा समाजावर नकारात्मक परिणाम होतो.