Surabhi Jayashree Jagdish
सामान्यपणे कारचे टायर ४० हजार ते ५० हजार किलोमीटर चालल्यानंतर बदलण्याचा विचार करावा. हा एक सामान्य अंदाज आहे आणि प्रत्येक कारच्या टायरचं आयुष्य सारखं असेलच असं नाही.
टायरची स्थिती चांगली असेल तर गाडी रस्त्यावर योग्य प्रकारे चालण्यास मदत होते. जास्त झिजलेले टायर गाडीच्या सुरक्षिततेवर परिणाम करू शकतात. म्हणून टायर खराब झाले असतील तर ते बदलण्यास उशीर करू नये.
टायर किती किलोमीटर टिकतील हे तुमच्या ड्रायव्हिंगच्या पद्धतीवरही अवलंबून असतं. गाडी वेगाने चालवणं, अचानक ब्रेक लावणं किंवा वारंवार जोरात वेग वाढवणं यामुळे टायरची झीज वाढू शकतं.
खराब रस्ते, खड्डे आणि दगडांमुळे टायरवर जास्त ताण येऊ शकतो. अशा रस्त्यांवर गाडी जास्त चालवल्यास टायरची झीज तुलनेने लवकर होऊ शकते. त्यामुळे खराब रस्त्यांवर नियमित प्रवास करणाऱ्यांनी टायरची स्थिती वारंवार तपासावी.
टायरच्या पृष्ठभागावरील ट्रेड म्हणजे रस्त्याला पकड देणारे खाचे असतात. हे खाचे जास्त झिजले आणि त्यांची पकड कमी झाली, तर टायर बदलण्याची वेळ जवळ आली आहे असं समजावं.
टायरवर भेगा, कट किंवा इतर नुकसान दिसत असेल तर त्याची तपासणी लगेच करून घ्यावी. नुकसान गंभीर असेल तर टायर वापरणं सुरू ठेवण्याऐवजी तो बदलणं योग्य आहे. अशा वेळी ४० किंवा ५० हजार किलोमीटर पूर्ण होण्याची वाट पाहू नये.
टायरची स्थिती तपासण्यासाठी साधारणपणे दर ६ महिन्यांनी त्यांची पाहणी करून घ्यावी. तपासणीमध्ये टायरची झीज, भेगा, कट आणि इतर नुकसान आहे का हे पाहता येते. नियमित तपासणी केल्यामुळे टायर बदलण्याची योग्य वेळ लक्षात येण्यास मदत होते.