Surabhi Jayashree Jagdish
बाईक चांगली चालण्यासाठी तिचं एअर फिल्टर स्वच्छ असणं आवश्यक आहे. माणसाला श्वास घेण्यासाठी स्वच्छ हवेची गरज असते, त्याचप्रमाणे इंजिनमध्ये पेट्रोलच्या वापरासाठी हवेची गरज असते. एअर फिल्टर ही हवा स्वच्छ करण्याचे काम करतो.
बाईक चालवताना हवेतली धूळ आणि माती एअर फिल्टर अडवतो. अनेक बाईकचे एअर फिल्टर सुमारे १०,००० किलोमीटरनंतर बदलण्याची गरज पडू शकते. मात्र तुमच्या बाईकच्या कंपनीने दिलेल्या सूचनांनुसार फिल्टर बदलण्याचा योग्य वेळ ठरवावा.
बाईक नेहमी स्वच्छ रस्त्यांवर चालवली जात नसेल तर एअर फिल्टर लवकर खराब होऊ शकतो. जास्त वाहतूक असलेल्या रस्त्यांवर किंवा धुळीच्या भागात बाईक चालवल्यास फिल्टरची अधिक वेळा तपासणी करावी लागते.
तुम्ही रोज धुळीच्या रस्त्यांवर, कच्च्या रस्त्यांवर किंवा जास्त प्रदूषण असलेल्या भागात बाईक चालवत असाल, तर एअर फिल्टर लवकर घाण होतो. अशा परिस्थितीत १०,००० किलोमीटर होण्याची वाट न पाहता दर ५,००० ते ८,००० किलोमीटरदरम्यान फिल्टर तपासून घ्यावा आणि गरजेनुसार बदलावा.
बाईकच्या प्रत्येक सर्व्हिसिंगवेळी मेकॅनिककडून एअर फिल्टर तपासून घ्यावा. सर्व्हिसिंग साधारणपणे २,००० ते ३,००० किलोमीटरनंतर करावी की नाही, हे बाईकच्या कंपनीने दिलेल्या शेड्यूलनुसार ठरवावं. अनेक बाईकमध्ये कागदापासून बनवलेले एअर फिल्टर असतात, त्यामुळे ते पाण्याने धुण्याऐवजी कंपनीच्या सूचनेनुसार स्वच्छ करावेत किंवा बदलून घ्यावेत.
एअर फिल्टर खूप घाण झाल्यास इंजिनमध्ये पुरेशी हवा जाण्यास अडचण होते. त्यामुळे बाईकच्या मायलेजमध्ये घट होऊ शकते आणि वेग वाढवताना तिचा प्रतिसादही कमी होऊ शकतो. इंजिनची कामगिरी बिघडल्यास किंवा इतर समस्या असल्यास सायलेन्सरमधून काळा धूरही येऊ शकतो.
बाईकची कामगिरी चांगली राहावी यासाठी प्रत्येक सर्व्हिसिंगवेळी मेकॅनिककडून एअर फिल्टरची तपासणी करून घ्यावी. फिल्टरवर खूप धूळ साचली असेल किंवा तो खराब झाला असेल तर कंपनीच्या सूचनेनुसार त्याची स्वच्छता करावी किंवा नवीन फिल्टर बसवावा.