Surabhi Jayashree Jagdish
चहा अनेक लोकांच्या रोजच्या जीवनाचा एक भाग आहे. सकाळी उठल्यावर किंवा कामाच्या वेळी अनेक जण चहा पितात. काही लोक दिवसातून दोन ते तीन वेळा चहा पिणे पसंत करतात.
बहुतेक लोकांना चहा गरम असतानाच प्यायला आवडतो. चहा थंड झाल्यानंतर त्याची चव आणि वास बदलल्यासारखे वाटू शकतं. त्यामुळे चहा बनवल्यानंतर लगेच पिण्याला अनेक जण प्राधान्य देतात.
अनेकदा कामाच्या गडबडीत बनवलेला चहा काही वेळ तसाच ठेवला जातो. नंतर तो चहा पुन्हा गरम करून पिण्याची वेळ येते. दूध घातलेला चहा खोलीच्या तापमानावर जास्त वेळ ठेवणं टाळावं.
चहा बराच वेळ ठेवला म्हणून तो थेट विष बनतो असं म्हणणे योग्य नाही. मात्र दूध आणि साखर असलेला चहा खोलीच्या तापमानावर जास्त वेळ राहिल्यास त्यात बॅक्टेरिया वाढण्याचा धोका वाढतो.
बनवलेला दूधाचा चहा तीन तास खोलीच्या तापमानावर ठेवला असेल तर तो पिणं टाळलं पाहिजे. अशा परिस्थितीत चहामध्ये जंतू वाढले असण्याची शक्यता असते आणि काही लोकांना पोटाचा त्रास होऊ शकतो.
दूध घातलेला चहा खोलीच्या तापमानावर साधारण दोन तासांपेक्षा जास्त वेळ ठेवू नये. वातावरणाचं तापमान जास्त असल्यास चहा आणखी लवकर खराब होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे चहा बनवल्यानंतर तो दोन तासांच्या आत प्यावा किंवा लवकर थंड करून फ्रिजमध्ये ठेवावा.
चहा बनवल्यानंतर शक्यतो लगेच पिणं हा सर्वात सोपा पर्याय आहे. चहा नंतर प्यायचा असेल तर तो खोलीच्या तापमानावर तासन्तास ठेवण्याऐवजी लवकर थंड करून झाकलेल्या भांड्यात फ्रिजमध्ये ठेवावा. बराच वेळ बाहेर ठेवलेला चहा पुन्हा उकळल्याने तो सुरक्षित होईलच असं नाही.