Surabhi Jayashree Jagdish
भाजीमध्ये तिखट जास्त पडणं ही स्वयंपाकघरातील सामान्य चूक आहे. अशा वेळी लगेच भाजी फेकून देण्याचा विचार करू नये. काही सोपे उपाय वापरून भाजीची चव पुन्हा सुधारता येते.
उपाय करण्यापूर्वी भाजी चाखून तिखटपणा किती वाढला आहे हे समजून घ्या. काही वेळा तिखट किंचित जास्त असतं. मात्र प्रमाण जास्त असेल तर त्यानुसार योग्य उपाय निवडल्यास चव अधिक चांगली राखता येते.
तिखटपणा कमी करण्यासाठी सर्व उपाय एकाच वेळी वापरणं टाळा. त्यामुळे भाजीची मूळ चव आणखी बदलू शकते. प्रथम एक उपाय करून परिणाम पाहणे अधिक योग्य ठरते.
भाजीमध्ये तिखट जास्त झालं असेल तर त्याच प्रकारचे इतर साहित्य वाढवून प्रमाण वाढवता येते. त्यामुळे तिखटपणा आपोआप कमी प्रमाणात वाटू लागतो. हा उपाय विशेषतः बटाटा, मटार किंवा इतर भाज्यांच्या पदार्थांसाठी उपयुक्त ठरतो.
लिंबाच्या रसातील आंबटपणा तिखटपणाचं संतुलन साधण्यास मदत करतो. भाजी तयार झाल्यानंतर थोडासा लिंबाचा रस घालून चांगलं मिसळावं. मात्र जास्त लिंबू घातल्यास चव आंबट होऊ शकते, त्यामुळे प्रमाणाची काळजी घ्यावी.
थोड्या प्रमाणात व्हिनेगर घातल्याने तिखटपणा कमी जाणवू शकतो. व्हिनेगरमधील आम्लीय गुणधर्म चवीचं संतुलन सुधारण्यास मदत करतात. मात्र व्हिनेगरचं प्रमाण खूप कमी ठेवणं आवश्यक आहे, अन्यथा त्याची चव जास्त जाणवू शकते.
टोमॅटोमधील नैसर्गिक आंबट-गोड चव तिखटपणा कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. भाजीमध्ये बारीक चिरलेला किंवा प्युरी केलेला टोमॅटो घालून काही मिनिटं शिजवा. यामुळे तिखटपणा कमी होण्यासोबतच भाजीची चवही अधिक चांगली होते.