Surabhi Jayashree Jagdish
भारतीय वायुसेनेचे माजी ग्रुप कॅप्टन अभिनंदन वर्धमान यांनी वायुसेनेतील आपली कारकीर्द संपवून आता प्रादेशिक विमान सेवा क्षेत्रात पाऊल ठेवलंय. अभिनंदन यांनी ३१ मार्च २०२६ रोजी भारतीय वायुसेनेतून निवृत्ती घेतल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर त्यांनी प्रादेशिक विमान कंपनी FLY91 मध्ये पायलट म्हणून नवी जबाबदारी स्वीकारली आहे.
अभिनंदन वर्धमान ऑगस्ट २०२६ मध्ये गोवास्थित FLY91 या प्रादेशिक विमान कंपनीत पायलट म्हणून रुजू झालेत. PTI ने सूत्रांच्या हवाल्याने त्यांच्या FLY91 मधील नियुक्तीची माहिती दिली आहे. सध्या ते व्यावसायिक विमान उड्डाणासाठी आवश्यक प्रशिक्षण आणि प्रक्रियेत असल्याची माहिती आहे.
अभिनंदन वर्धमान २०१९ मध्ये भारत आणि पाकिस्तानदरम्यान झालेल्या हवाई संघर्षानंतर देशभर चर्चेत आले होते. २७ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या हवाई चकमकीदरम्यान त्यांनी मिग-२१ बायसनमधून पाकिस्तानी F-16 लढाऊ विमान पाडल्याचं भारतीय बाजूने सांगितले गेले आणि याच कामगिरीमुळे त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली. मात्र या कारवाईदरम्यान अभिनंदन यांचं मिग-२१ विमानही लक्ष्य कऱण्यात आलं होतं. त्यांना पॅराशूटच्या सहाय्याने पाकिस्तानच्या ताब्यातील भागात उतरावं लागलं.
विमानातून बाहेर पडल्यानंतर अभिनंदन वर्धमान पाकिस्तानच्या ताब्यात गेले होते. २७ फेब्रुवारी २०१९ रोजी पकडले गेलेले अभिनंदन जवळपास तीन दिवस पाकिस्तानच्या ताब्यात होते. त्यानंतर १ मार्च २०१९ रोजी त्यांना भारताकडे सोपवण्यात आलं.
अभिनंदन यांच्या FLY91 मधील भूमिकेबाबत कंपनीकडून सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही. कंपनीच्या प्रवक्त्याने कर्मचाऱ्यांची वैयक्तिक माहिती ही खासगी बाब असल्याचं सांगत त्यांच्या भूमिकेवर भाष्य करण्यास नकार दिला.
FLY91 या प्रादेशिक विमान कंपनीने मार्च २०२४ मध्ये व्यावसायिक विमानसेवा सुरू केली होती. कंपनीच्या ताफ्यात सध्या सहा ATR 72-600 विमानं असल्याची माहिती उपलब्ध आहे.
गोवा आणि हैदराबाद ही FLY91 ची दोन प्रमुख परिचालन केंद्रं असून कंपनी प्रादेशिक मार्गांवर सेवा देते.
अभिनंदन वर्धमान यांना २०२१ मध्ये त्यांच्या २०१९ मधील शौर्यासाठी वीर चक्राने सन्मानित करण्यात आलं. वीर चक्र हा युद्धकाळात दिला जाणारा भारताचा तिसरा सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे. हवाई संघर्षादरम्यान दाखवलेल्या असामान्य कर्तव्यनिष्ठेबद्दल त्यांच्या शौर्याचा गौरव या पुरस्काराने करण्यात आला.