Surabhi Jayashree Jagdish
दातेगड किल्ला सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात असून त्याला सुंदरगड असंही म्हटलं जातं. पाटण शहराच्या परिसरात असलेल्या या किल्ल्याची भौगोलिक रचना आणि कातळातील वास्तू त्याचे प्रमुख वैशिष्ट्य मानले जाते. दातेगडची सर्वात महत्त्वाची ओळख म्हणजे येथील तलवारीच्या आकाराची विहीर होय.
ही विहीर काळ्या कातळात खोदलेली असून तिची लांबट रचना वरून पाहिल्यावर तलवारीसारखी दिसते. विहिरीचा मुख्य लांब भाग तलवारीच्या पात्यासारखा दिसतो तर पायऱ्यांकडील रचना तलवारीच्या मुठीची आठवण करून देते. म्हणूनच दातेगडची ही जलरचना सामान्य विहिरींपेक्षा वेगळी ठरते आणि तिची ओळखच ‘तलवारीच्या आकाराची विहीर’ अशी झाली आहे.
या विहिरीची लांबी सुमारे ५० मीटर आणि खोली सुमारे ३० मीटर असल्याची माहिती आहेत. तर इतर स्रोतांनुसार २५ ते ३० मीटरच्या आसपासची लांबी नमूद केलीये.
या विहिरीत खाली जाण्यासाठी कातळातच पायऱ्या कोरण्यात आल्या आहेत. विहिरीच्या आत पाण्याच्या जवळ कातळात खोदलेली छोटी गुहा आणि महादेवाची पिंड असल्याचा उल्लेखही काही स्रोतांमध्ये आढळतो.
या विहिरीचं सर्वात मोठं गूढ म्हणजे एवढी वैशिष्ट्यपूर्ण तलवारीसारखी रचना नेमक्या कोणत्या उद्देशाने करण्यात आली याचं स्पष्ट ऐतिहासिक उत्तर उपलब्ध नाही. मात्र किल्ल्यावरील जलसाठ्याची गरज पूर्ण करण्यासाठी ही कातळातील जलरचना उपयोगात आणली गेली असावी, असा संदर्भ आढळतो.
पंधराव्या शतकात दातेगड शिर्क्यांच्या ताब्यात होता आणि मलिक उत्तुजारच्या मोहिमेनंतर तो बहमनी सत्तेत गेला. त्यानंतर बहमनी राज्याचे विभाजन झाल्यावर हा किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात गेल्याची माहिती आहे.
दातेगडच्या तलवारीच्या आकाराच्या विहिरीची अधिकृत पुष्टी करण्यासाठी सातारा जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद सातारा यांच्या पर्यटन माहितीत विहीर अखंड कातळात कोरलेली असल्याचे स्पष्ट नमूद केले आहे.