Surabhi Jayashree Jagdish
रोज चहा गाळताना चहापत्ती आणि चहातील टॅनिनचा थर गाळणीवर जमा होत जातो. कालांतराने हा थर कडक होऊन गाळणीची छिद्रे अंशतः किंवा पूर्णपणे बंद होतात. त्यामुळे गाळणीचा वापर करताना चहा नीट गाळला जात नाही.
अनेकजण गाळणी डिशवॉश जेल किंवा साबणाने धुतात. मात्र हट्टी डाग आणि काळा थर अनेकदा सहज निघत नाही. त्यामुळे अधिक प्रभावी घरगुती उपाय वापरणं फायदेशीर ठरते.
एक खोल भांडे आणि गाळणी पूर्ण बुडेल इतके पाणी घ्या. त्यामध्ये अर्धा चमचा बेकिंग सोडा, एक चमचा डिटर्जंट पावडर आणि अर्धा चमचा मीठ घाला. शेवटी स्वच्छ करण्यासाठी स्टील वूल किंवा स्क्रबर जवळ ठेवा.
तयार केलेलं मिश्रण गॅसवर गरम करण्यास ठेवा. पाणी गरम झाल्यावर त्यामध्ये काळी पडलेली गाळणी पूर्णपणे बुडवा. पाणी उकळल्यानंतर गाळणी ५ ते १० मिनिटं त्याच पाण्यात राहू द्या आणि नंतर गॅस बंद करून भांडं काही वेळ झाकून ठेवा.
पाणी थोडं थंड झाल्यावर गाळणी बाहेर काढा. स्टील वूल किंवा स्क्रबरने हलक्या हाताने गाळणी घासा. आधीच घाण मऊ झालेली असल्यामुळे कमी मेहनतीत काळा थर निघू लागतो.
गाळणी स्वच्छ पाण्याखाली नीट धुवून घ्या. त्यामुळे उरलेली चहापत्ती, डिटर्जंट आणि इतर घाण पूर्णपणे निघून जाते. गाळणीची बंद झालेली छिद्रेही मोकळी होतात आणि ती पुन्हा स्वच्छ दिसू लागते.
आठवड्यातून एकदा किंवा किमान १५ दिवसांतून एकदा ही पद्धत वापरणं चांगलं. यामुळे हट्टी काळा थर जास्त प्रमाणात साचत नाही. गाळणी दीर्घकाळ स्वच्छ, चमकदार आणि वापरण्यास योग्य राहते.