Manasvi Choudhary
प्रत्येकाच्या घरी रोज दोन ते तीन वेळा चहा बनवला जातो. चहा गाळल्यानंतर आपण उरलेली चहापावडर कचऱ्याच्या डब्ब्यात फेकून देतो. पण तुम्हाला माहीत आहे का? ही चहापावडर कचरा नसून घरातील अनेक कामांसाठी क्लिनिंग म्हणून उपयोगी ठरते.
चहापावडरमध्ये नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स, टॅनिन आणि आम्लधर्मी गुणधर्म असतात, जे घरातील तेलकटपणा, काचेवरील डाग आणि लाकडावरील मळ काढण्यासाठी उपयुक्त ठरतात.
1) चहा बनवल्यानंतर त्यात साखर आणि दुधाचे अंश असतात. त्यामुळे वापरलेली चहापावडर २ ते ३ वेळा स्वच्छ धुवा.
2) त्यानंतर ही पावडर पाण्यात टाकून पुन्हा गॅसवर उकळून घ्या नंतर पाणी गाळून थंड करा.
उरलेल्या चहापावडरचे पाणी एका स्प्रे बॉटलमध्ये भरा. काचेच्या खिडक्या, आरसे किंवा काचेच्या टेबलवर हे पाणी फवारा आणि सुती कापडाने स्वच्छ पुसून घ्या. काच अगदी आरशासारखी चमकेल.
उरलेल्या चहापत्तीचे पाणी कोमट असताना त्यात स्वच्छ कापड बुडवा आणि चांगले पिळून घ्या. या कापडाने घरातील लाकडी दरवाजे, डायनिंग टेबल आणि कपाटे पुसल्यास लाकडावरील डाग निघून जाईल आणि फर्निचरला नवीन चमक येते.
कढई किंवा पॅन खूप जास्त तेलकट झाली असतील, तर वापरलेली चहापावडर गरम पाण्यात मिक्स करून त्या भांड्यांवर लावा. १० ते १५ मिनिटे तसेच ठेवा, त्यानंतर घासल्यास भांड्यावरील सर्व तेलकटपणा आणि चिकटपणा झटपट निघून जाईल.
उरलेली चहापावडर कडक उन्हामध्ये चांगली वाळवून घ्या. ही वाळलेली पावडर एका लहान पातळ सुती पिशवीत किंवा कपड्यात बांधून रेफ्रिजरेटरच्या एका कोपऱ्यात ठेवा. यामुळे फ्रिजमधील कुबट किंवा अन्नाचा वास पूर्णपणे नाहीसा होईल.
सिंकच्या ड्रेन पाईपमधून अनेकदा दुर्गंधी येते. यासाठी उकडलेली चहापावडर सिंकच्या ड्रेनमध्ये टाका आणि त्यावर गरम पाणी ओता. यामुळे सिंकमधील दुर्गंधी नाहीशी होण्यास मदत होईल.