Shreya Maskar
चांगल्या आरोग्यासाठी ८ तास किंवा ८ तासांच्या वर झोप घेणे खूप गरजेचे असते. मात्र धावपळीमुळे अनेकांची सतत ७ तासांपेक्षा कमी झोप होत. याचा परिणाम शरीरासोबतच मेंदू आणि मानसिक आरोग्यावरही होऊ शकतो.
अपुऱ्या झोपेमुळे भूक आणि तृप्ती नियंत्रित करणाऱ्या हार्मोन्समध्ये बदल होऊ शकतात. त्यामुळे जास्त खाण्याची इच्छा होऊ शकते.
दीर्घकाळ अपुरी झोप आणि अनियमित झोपेच्या सवयींचा उच्च रक्तदाबासह हृदय, रक्तवाहिन्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याशी संबंध आढळतो.
दीर्घकाळ अपुरी झोप इन्सुलिन संवेदनशीलता आणि ग्लुकोज मेटाबॉलिझमवर परिणाम करू शकते, ज्यामुळे टाइप-२ मधुमेहाचा धोका वाढण्याशी संबंध दिसून आला आहे.
कमी झोपेमुळे चिडचिड, तणाव, अस्वस्थता आणि भावनिक प्रतिक्रिया वाढू शकतात. अपुरी झोप झाल्यामुळे दिवसभर सुस्ती, आळस आणि ऊर्जा कमी असल्यासारखे वाटू शकते.
पुरेशी झोप शरीराच्या रोगप्रतिकारक यंत्रणेच्या योग्य कार्यासाठी महत्त्वाची आहे. झोप कमी असल्यास संसर्गाशी लढण्याची क्षमता प्रभावित होऊ शकते.
झोपेच्या कमतरतेमुळे लक्ष केंद्रित करणे, नवीन माहिती लक्षात ठेवणे आणि निर्णय घेणे कठीण होऊ शकते. झोप कमी झाल्यामुळे प्रतिक्रिया देण्याचा वेग, सतर्कता आणि निर्णयक्षमता कमी होऊ शकते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.