Surabhi Jayashree Jagdish
पोटाच्या आतील भागात असामान्य पेशींची वाढ होऊन त्यांची अनियंत्रित वाढ सुरू झाली, तर त्यातून पोटाचा कॅन्सर होऊ शकतो. सुरुवातीला या आजाराची लक्षणं फार ठळक नसू शकतात आणि सामान्य पचनाच्या तक्रारींसारखीच जाणवू शकतात.
सतत अपचन होणं, पोट फुगणं, गॅस होणं किंवा छातीत जळजळ जाणवणं ही पोटाच्या कॅन्सरमध्ये दिसू शकणारी लक्षणं आहेत. ही लक्षणं सुरुवातीला सामान्य अॅसिडिटी किंवा पचनाच्या समस्येसारखी वाटू शकतात.
डाएट किंवा व्यायामामध्ये कोणताही बदल केलेला नसतानाही वजन कमी होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. पोटाच्या कॅन्सरमध्ये भूक कमी होणं किंवा थोडेसं खाल्ल्यानंतरही पोट भरल्यासारखं वाटणं यामुळे आहाराचं प्रमाण कमी होऊ शकतं. यामुळे तुमचं वजन कमी होऊ लागतं.
पोटाच्या वरच्या भागात वारंवार दुखणं, जडपणा जाणवणं किंवा सतत अस्वस्थ वाटणं हेही पोटाच्या कॅन्सरमध्ये दिसणारं लक्षण असू शकतं. हा त्रास कधी सौम्य तर कधी अधिक जाणवू शकतो आणि काही वेळा जेवल्यानंतर तो वाढू शकतो.
अन्न किंवा पाणी गिळताना अडथळा जाणवणं किंवा गिळताना त्रास होणं हे पोटाच्या कॅन्सरमध्ये दिसू शकणारं लक्षण आहे. हा त्रास सुरुवातीला कमी असला तरी कालांतराने वाढू शकतो. गिळताना त्रास वारंवार होत असल्यास किंवा वाढत असल्यास डॉक्टरांकडून तपासणी करून घेणं गरजेचं आहे.
उलटीमध्ये रक्त दिसणं हे पचनसंस्थेत रक्तस्रावाचं लक्षण असू शकतं. शौचाचा रंग काळा होणं हे देखील पचनसंस्थेच्या वरच्या भागातून रक्तस्राव झाल्याचे संकेत देऊ शकते. अशी लक्षणं दिसल्यास ती कोणत्याही परिस्थितीत दुर्लक्षित न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
पुरेशी झोप आणि विश्रांती घेतल्यानंतरही सतत थकवा जाणवणं किंवा शरीरात अशक्तपणा वाढत जाणं हे पोटाच्या कॅन्सरशी संबंधित असू शकतं. पोटातून दीर्घकाळ कमी प्रमाणात रक्तस्राव झाल्यास रक्तातील हिमोग्लोबिन कमी होऊन अॅनिमिया होऊ शकतो आणि त्यामुळे थकवा जाणवतो.
ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.