Surabhi Jayashree Jagdish
पुरेशी झोप किंवा विश्रांती घेतल्यानंतरही जाणवणारा आणि दैनंदिन कामांवर परिणाम करणारा तीव्र थकवा हे एक लक्षण आहे. काही कॅन्सरमध्ये कॅन्सरच्या पेशी शरीरातील ऊर्जा आणि पोषकद्रव्यांचा वापर करतात. त्यामुळे थकवा येतो.
तोंडातील व्रण, जखम किंवा लाल-पांढरे डाग काही दिवसांत बरे न होता कायम राहिल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ न भरलेला तोंडातील व्रण, गिळताना त्रास किंवा सतत घोगरा आवाज ही तोंड आणि घशाशी संबंधित कॅन्सरमध्ये दिसू शकणारी लक्षणे आहेत.
कारण स्पष्ट नसताना शरीराच्या कोणत्याही भागातून रक्तस्राव होणं हे तपासून घेण्यासारखं लक्षण आहे. लघवीत किंवा शौचात रक्त दिसणं, मासिक पाळीच्या काळाबाहेर रक्तस्राव होणं किंवा रजोनिवृत्तीनंतर रक्तस्राव होणं याकडे विशेष लक्ष द्यावं.
तोंड आणि घशाच्या कॅन्सरमध्ये न भरून येणारे व्रण, आवाजात बदल किंवा गिळताना त्रास दिसू शकतो, तर स्तनाशी संबंधित कॅन्सरमध्ये स्तन किंवा बगलेत गाठ आणि निप्पलमधून असामान्य स्त्राव जाणवू शकतो. गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरमध्ये नेहमीच्या पाळीपेक्षा वेगळा किंवा अनियमित रक्तस्राव दिसू शकतो, तर फुफ्फुस आणि पचनसंस्थेशी संबंधित कॅन्सरमध्ये सततचा खोकला, भूक कमी होणे, पोटातील अस्वस्थता किंवा वजन कमी होणे यांसारखे बदल दिसू शकतात.
कॅन्सरची सुरुवात पेशींच्या अनियंत्रित वाढीपासून होते आणि ट्यूमर वाढत असताना आसपासच्या ऊती किंवा त्यांच्या सामान्य कार्यावर परिणाम होऊ शकतो. काही परिस्थितींमध्ये या बदलांचा परिणाम शरीरातील रक्तपुरवठा, ऊर्जा-वापर, भूक आणि वजन यांवर होऊन थकवा, सूज किंवा वजनातील अनपेक्षित बदल जाणवू शकतात.
काही कॅन्सरमध्ये लक्षणं दिसण्यापूर्वीच स्क्रीनिंगच्या माध्यमातून आजाराचा शोध घेता येतो. त्यामुळे योग्य वयोगट आणि जोखीम लक्षात घेऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासण्या करणं महत्त्वाचं आहे. स्तनाच्या कॅन्सरसाठी मॅमोग्राफी आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरसाठी उपलब्ध स्क्रीनिंग पद्धती काही महिलांमध्ये आजार लवकर शोधण्यास मदत करू शकतात.
तंबाखूचे सेवन टाळणं, संतुलित आहार घेणं, नियमित शारीरिक हालचाल करणं आणि योग्य स्क्रीनिंग करून घेणं हे कॅन्सरचा धोका कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे उपाय आहेत. शरीरात नवीन किंवा अनपेक्षित बदल दिसून तो काही आठवडे टिकत असेल, वाढत असेल किंवा वारंवार होत असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधा.
ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.