Sakshi Sunil Jadhav
देशात आणि जगभर कॅन्सरचे रुग्ण वाढत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अंदाजानुसार, पुढील काही वर्षांत कॅन्सर हा सर्वात जास्त मृत्यू करणाऱ्या आजारांमध्ये पहिल्या क्रमांकावर असू शकतो. योग्य माहिती, जीवनशैलीतले बदल आणि वेळेत तपासणी केल्यास ४०-५०% कॅन्सर टाळता येऊ शकतो, असे तज्ज्ञ सांगतात.
सुरुवातीला थकवा, पोटदुखी, वजन कमी होणे, त्वचेवर बदल, जखमा बऱ्या न होणे ही चिन्हे सामान्य समस्या म्हणून दुर्लक्षित केली जातात. पण ही कॅन्सरची सुरूवातीची गंभीर संकेत असू शकतात.
तंबाखू, सिगारेट, गुटखा, पान-मसाला यामुळे तोंड, घसा, फुफ्फुस, मूत्राशय आणि लिव्हरचा कॅन्सर मोठ्या प्रमाणावर आढळतो. भारतात या कारणाने सगळ्यात जास्त कॅन्सरचे रुग्ण आढळत आहेत.
जास्त मद्यपानामुळे लिव्हर, स्तन, अन्ननलिका आणि ओरल कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. भारतात तरुणांमध्ये ही सवय वाढत असल्याने चिंता वाढली आहे.
जंक फूड, प्रक्रिया केलेले मांस, साखरयुक्त पदार्थ, व्यायाम टाळणे आणि कमी भाज्यांचे सेवन यामुळे कोलन, स्तन आणि प्रोस्टेट कॅन्सरचा धोका वाढतो. लठ्ठपणा हा सायलेंट रिस्क फॅक्टर मानला जातो.
दिवसभर बसून राहणं, कमी हालचाल, निष्क्रिय जीवनशैलीमुळे शरीरातील पेशींचे संतुलन बिघडते आणि कॅन्सरचा धोका वाढतो. WHO नुसार, दररोज ३० मिनिटांचा व्यायाम शरीराला सुरक्षित ठेवतो.
UV किरणांमुळे त्वचेला नुकसान होते आणि मेलानोमा सारखे त्वचेचे गंभीर कॅन्सर होऊ शकतात. सनस्क्रीन, टोपी आणि स्वच्छ कपडे वापरण्याची गरज असल्याचे डॉक्टर सुचवतात.
कॅन्सर हा अचानक होत नाही. तो शरीरातील दीर्घकालीन बदल आणि जीवनशैलीमुळे विकसित होतो. वेळेत चेतावणीची चिन्हं ओळखली, तर उपचार शक्य आहेत, असे ऑन्कोलॉजिस्ट सांगतात.
ही माहिती केवळ जनजागृतीसाठी असून वैद्यकीय निदान किंवा उपचाराचा पर्याय नाही. कोणत्याही लक्षणांबाबत तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.